नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेल्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांची चळवळ स्वार्थी वाटली, असे सनसनाटी विधान ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिकने आपल्या ‘विटनेस’ या पुस्तकात केले आहे.

ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या शोषणाचे आरोप करून जवळपास दीड वर्षे आघाडीच्या कुस्तीगिरांचे आंदोलन सुरू होते. ब्रिजभूषण आणि महासंघाच्या विरोधातील या लढाईत साक्षी, बजरंग आणि विनेश हे तीन प्रमुख चेहरे होते. ‘महासंघाविरुद्धची ही चळवळ होती. त्यामुळे बजरंग आणि विनेश यांनी जेव्हा आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणीतून सूट मागितली, तेव्हा त्यांची चळवळीची भूमिका स्वार्थी असल्याचे वाटले. त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांचे कान भरले आणि महासंघाविरुद्धच्या आमच्या लढ्याला धक्का लागण्याच सुरुवात झाली,’ असे साक्षीने लिहिले आहे.

हेही वाचा >>> Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकीला वगळणार? खर्चात कपात करण्यासाठी कठोर निर्णयाची शक्यता

‘माझेही मन वळविण्याचा विचार झाला होता. मात्र, मी निवड चाचणीतून सूट घेणार नाही ही भूमिका कायम ठेवली,’ असे साक्षीने पुढे म्हटले आहे. मात्र, बजरंग आणि विनेशवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण होत्या, याबाबत लिहिणे तिने टाळले. पत्रकार जोनाथन सेल्वाराज यांच्या साथीने विनेशने हे पुस्तक लिहिले आहे.

‘चाचणीतून सूट मागून काही वेगळे घडले नाही. मात्र, आंदोलक कुस्तीगिरांच्या प्रतिमेला जरूर धक्का बसला. आमचे आंदोलन एक स्वार्थी चळवळ आहे असे सर्वांना वाटू लागले,’ अशी टीका साक्षीने केली आहे.

साक्षीने पुस्तकातून वैयक्तिक आयुष्यावरही टिप्पणी करताना कारकीर्दीमधील बहुतेक पुरस्कार रक्कम माझ्या कुटुंबीयांनी काढून घेतली आहे, असे लिहिले आहे. कुटुंबीयांचा मी सत्यव्रत काडियानशी विवाह करण्यासही विरोध होता. मात्र, मी ठाम भूमिका घेतली आणि सत्यव्रतशीच नाते जोडले, असेही साक्षीने म्हटले आहे.

बबिता फोगटही लक्ष्य…

साक्षीने चळवळीविषयी सविस्तर लिहिताना बबिता फोगटवरही ताशेरे ओढले आहेत. या चळवळीत आम्हा तिघांची बाजू घेणे यामागे बबिताचा स्वार्थी हेतू होता. बबिताला ब्रिजभूषण यांच्यापासून नुसती सुटका करून घ्यायची नव्हती, तर तिला त्यांची जागा घ्यायची होती, असे दावाही साक्षीने केला आहे.