क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित करण्याबरोबरच त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीदेखील बरखास्त केली आहे. या निर्णयाचं कुस्तीपटूंकडून स्वागत होत आहे. दरम्यान, संजय सिंह आणि बृजभूषण शरण सिंह (कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे सर्वांचं लक्ष वळलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? तसेच ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत घेणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. साक्षी आणि बजरंगने यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे साक्षी मलिक हिने कुस्तीला कायमचा रामराम केला होता. तसेच बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर बजरंग पंतप्रधान निवासाबाहेरच्या फूटपाथवर ठेवून पदक ठेवून तिथून निघून गेला होता. त्यामुळे संजय सिंह यांच्या निलंबनानंतर हे दोन्ही खेळाडू त्यांचा निर्णय मागे घेणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
साक्षी मलिक हिने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं असून ती म्हणाली, “आमचा लढा देशाच्या सरकारविरोधात कधीच नव्हता. आमचा लढा केवळ एका माणसाविरोधात होता. कारण आम्हाला आपल्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे. नव्या मुली कुस्तीच्या मैदानात उतरत आहेत. या मुलींची आम्हाला काळजी आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत. मी तर आधीच संन्यास घेतला आहे. त्यामुळे माझी आता एवढीच इच्छा आहे की आपल्या भारताच्या लेकींना न्याय मिळायला हवा.” दरम्यान, साक्षीला प्रश्न विचारण्यात आला की, आता निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? यावर ती म्हणाली, जे काही पुढे ठरेल ते मी तुम्हाला सांगेन.
दुसऱ्या बाजूला बजरंग पुनियानेदेखील त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. बजरंग पुनिया म्हणाला, “न्याय मिळत नाही तोवर मी पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही.” पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बजरंगने म्हटलं आहे की, मी पद्मश्री परत घेणार नाही. आम्हाला न्याय मिळाल्यानंतरच मी पुरस्कार परत घेण्याबाबत विचार करेन. कोणताही पुरस्कार आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही. सर्वात आधी आमच्या बहिणींना न्याय मिळायला हवा.
बजरंगने पुरस्कार परत का केला?
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. ही निवडणूक ४० विरुद्ध ७ अशा मतांच्या फरकाने जिंकत संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष झाले होते. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करत दिल्लीत सलग ४० दिवस ठिय्या आंदोलनही केलं होतं. कुस्तीपटूंच्या या आंदोलनानंतरही बृजभूषण सिंह यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. केवळ त्यांना कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली. परंतु, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वातील पॅनेल जिंकलं. त्यामुळे साक्षी मलिकने निराश होऊन कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याच जाहीर केलं. तर बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत केला होता.
हे ही वाचा >> Award Wapsi : बजरंग पुनियाच्या आधी ‘पद्म पुरस्कार’ परत करणाऱ्या ‘या’ दिग्गजांविषयी जाणून घ्या
पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवलं पदक
बजरंग पुनिया याने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी (२२ डिसेंबर) पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने बजरंग पुनिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. परंतु, पंतप्रधान निवासाजवळ सुरक्षारक्षकांनी त्याला अडवलं. बजरंग पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्याने पंतप्रधानांच्या घराजवळच्या पदपथावर (फूटपाथ) त्याचा पद्मश्री पुरस्कार ठेवला आणि तिथून निघून गेला.