भारतीय कुस्तीपटू जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी सज्ज
नवी दिल्ली : भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया याला १४ सप्टेंबरपासून कझाकस्तान येथील नूर-सुलतान येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ६५ किलो वजनी गटात अव्वल मानांकन मिळाले आहे. या स्पर्धेद्वारे टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय कुस्तीपटू सज्ज झाले आहेत.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला बजरंग सध्या रशिया येथे सराव करत असून गेल्या वेळी त्याने रौप्य तर २०१३मध्ये कांस्यपदकासाठी कमाई केली होती.
२०१०मध्ये भारताला एकमेव जागतिक सुवर्णपदक मिळवून देणारा सुशील कुमार या स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याला ६१ किलो गटात दुसरे मानांकन मिळाले आहे. ८६ किलो गटात कनिष्ठ गटातील जागतिक विजेता दीपक पुनिया याला चौथे मानांकन देण्यात आले आहे. ‘‘माझा सराव चांगला झाला असून जागतिक स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे दीपकने सांगितले.
महिलांमध्ये, सीमा बिसला हिच्याकडून भारताला पदकाच्या अपेक्षा असून तिला ५० किलो दुसरे मानांकन मिळाले आहे. यासार डोगू कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे सीमाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी मजल मारली आहे.
परदेशी कुस्तीगीरांसह सराव केल्याचा चांगला फायदा मला होणार आहे. जॉर्जिया, रशिया आणि अमेरिकेतील अव्वल कुस्तीगीरांसह दोन हात केल्यामुळे प्रतिस्पध्र्याना आता माझी धडकी भरू लागली आहे. त्यामुळेच जागतिक स्पर्धेआधी माझा आत्मविश्वास उंचावला आहे. ४ सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा फायदा कुस्तीपटूंना होणार आहे. – बजरंग पुनिया