पीटीआय, नवी दिल्ली

उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनियाला वर्षअखेरपर्यंत निलंबित केले आहे. जागतिक संघटनेच्या या निर्णयामुळे केवळ ऑलिम्पिकच नाही, तर बजरंगच्या कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारतातील सर्वात यशस्वी कुस्तीगीर असलेल्या बजरंगने २३ एप्रिल रोजी केलेल्या चाचणीस नकार दिल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. आपण चाचणीस कधीच नकार दिला नव्हता. चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य वापरण्यात येत असल्याबद्दल आपण त्याबाबत विचारणा केली होती अशी प्रतिक्रिया बजरंगने त्यावेळी दिली होती.

हेही वाचा >>>ट्रेव्हिस हेड IPL मध्ये करतोय T20 वर्ल्डकपची तयारी, लखनऊवरील विजयानंतर ‘त्या’ वक्तव्याने उडवली सर्वांची झोप

जागतिक महासंघाने आपल्या संकेतस्थळावर बजरंगच्या नावापुढे निलंबित असे नमूद केले असले, तरी जागतिक संघटनेकडून आपल्याशी कुठल्याही प्रकाराच संवाद साधण्यात आलेला नाही, असे बजरंग म्हणाला. उत्तेजकविरोधी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून, यामुळे आम्ही त्याला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत निलंबित करत आहोत, असे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने स्पष्ट केले आहे.

मीच चकित, योजना रद्द

परदेशी प्रशिक्षणासाठी आपण ‘साइ’ कडे निधीबाबत विचारणा केल्याचे बजरंगने मान्य केले. मात्र, कारवाईनंतरही निधी मंजूर झाल्याचे पाहून आपणच चकित झालो आहोत, असे सांगत बजरंगने प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे नियोजन रद्द केले असल्याचे सांगितले. ‘नाडा’च्या कारवाईबाबत वकिलाने उत्तर दिले असल्याची माहितीही बजरंगने दिली.

अंशू की सरिता

महिला कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गट हा खरा विनेश फोगटचा होता. पण, ती अपयशी ठरली आणि तिची जागा अंशू मलिकने घेतली. अंशूने जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिक कोटा पण मिळवला. आता अंशूसमोर सरिता मोर हिचे आव्हान उभे राहील. अंशूला जपानमधील प्रशिक्षणासाठी १४ लाख, तर सरिताला अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी ६ लाख ‘साइ’ने मंजूर केले आहेत. आता ऑलिम्पिकला अंशू जाणार की सरिता हे ऑलिम्पिकपूर्व देशांतर्गत चाचणीत स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साइ’कडून निधी मंजूर

उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘नाडा’ने बजरंग पुनियाला निलंबित केले असताना देखील भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) परदेशातील प्रशिक्षणासाठी बजरंगला ९ लाख रुपये मंजूर केल्याचे समोर आले आहे. हा निर्णय २५ एप्रिल रोजी घेण्यात आला असून, बजरंग २८ मेपासून रशियात दागेस्तान येथे प्रशिक्षणासाठी जाणे अपेक्षित होते. या संदर्भात ‘साइ’चे महासंचालक संदीप प्रधान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.