Bajrang Punia on Vinesh Phogat retirement: भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने गुरुवारी (दि. ८ ऑगस्ट) कुस्तीमधून निवृत्ती जाहिर केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी अपात्रतेचे प्रकरण घडल्यानंतर विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केली. विनेशने कुस्तीचा निरोप घेतल्यानंतर तिचा सहकारी बजरंग पुनियाने एक्सवर पोस्ट करून मोठा दावा केला आहे. विनेश फोगटच्या एक्स पोस्टला शेअर करत बजरंग पुनियाने ति्या निवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशय व्यक्त केला आहे. बजरंग पुनियाचा हा दावा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
काय म्हटले बजरंग पुनियाने?
कुस्तीपटू विनेश फोगटने आज पहाटे एक्सवर निवृत्तीची पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये तिने आईची माफी मागितली. माझ्यात आता लढण्याचे बळ नाही, असे म्हणत तिने निवृत्ती जाहिर केली. या पोस्टला शेअर करत बजरंग पुनियाने म्हटले, “विनेश तू हरलेली नाहीस, तुला हरवलं गेलं आहे. आमच्यासाठी तू सदैव विजेता राहशील. तू भारताची मुलगी आणि भारताचा अभिमानही आहेस.”
बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला धक्का देणाऱ्या घडामोडी घडल्या. ५० किलो वजनी गटातील महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिलीच महिला ठरली होती. त्यामुळे संपूर्ण देशात आनंद व्यक्त केला जात होता. आता सुवर्ण किंवा रौप्य पदक नक्कीच मिळणार, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र बुधवारी सकाळी विनेशचे वजन ५० किलोहून १०० ग्रॅम अधिक भरल्याची बातमी समोर आली. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने तिला अपात्र ठरविले. यानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
विनेश फोगटला निदान रौप्य पदक तरी देण्यात यावे, अशी मागणी भारताकडून करण्यात आली. मात्र जागतिक कुस्ती संघटनेने (United World Wrestling) सध्याच्या नियमांकडे बोट दाखवत ही मागणी फेटाळून लावली. वजनासंबंधी नियम बदलता येणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्यानंतर रौप्यपदकाच्या आशाही निवळल्या.
हे ही वाचा >> Vinesh Phogat : “विनेशला रौप्य पदक द्या”, अमेरिकेच्या ऑलिम्पिकवीराची मागणी; नियम बदलाचा प्रस्ताव मांडत म्हणाला…
विनेश फोगटची पोस्ट काय?
“माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती २००१-२०२४ आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी” आई कुस्ती आज तू जिंकलीस आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर. असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतला आहे.
दरम्यान, क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत याप्रकरणी सरकारची भूमिका बुधवारी सविस्तरपणे मांडली. ते म्हणाले, याप्रकरणी आवश्यक ती सर्व प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विनेश ही एक चॅम्पियन खेळाडू आहे. तर विरोधी पक्षांनी या अपात्रता प्रकरणात कटाचा संशय व्यक्त केला आहे.