भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या जाँग सोलचा ८-१ ने पराभव केला. या कामगिरीसह बजरंगने ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याचसोबत भारताचा आणखी एक मल्ल रवी कुमार दाहीयानेही आपलं टोकियोचं तिकीट पक्क केलं आहे. ५७ किलो वजनी गटात रवी कुमारने गतविजेत्या युकी ताकाहाशीला ६-१ असं नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रवी कुमारसमोर उपांत्य फेरीत झौर युगूएव्हचं आव्हान असणार आहे.

बजरंग पुनियाला नुकताच मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच बजरंगने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. बजरंग पुनियाच्या नावावर राष्ट्रकुल खेळांमध्ये एक रौप्य आणि एक सुवर्णपदक जमा आहे. भारतीय पुरुष मल्लांनी चांगली कामगिरी केली असली, तरीही २०१६ रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ६२ किलो वजनी गटात नायजेरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने साक्षीला १०-७ असं पराभूत केलं. बुधवारी याच स्पर्धेत विनेश फोगटने आपलं टोकियो ऑलिम्पिकमधलं स्थान पक्क केलं होतं.

Story img Loader