भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह अनेक कुस्तीगीर ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. मागील अनेक दिवसांपासून ते सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनुराग ठाकूर यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक कुस्तीपटूंनी १५ जूनपर्यंत आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या अल्पवयीन मुलीनं आपली तक्रारही मागे घेतली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून पीडित महिला कुस्तीपटूंना घाबरवण्याचं काम केलं जात आहे, असा आरोप बजरंग पुनियाने केला.
खरं तर, शुक्रवारी एक महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात गेली होती. त्यामुळे संबधित महिला खेळाडू तडजोड करण्यासाठी ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे गेली, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी चालवल्या. यावर बजरंग पुनिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिला खेळाडू WFI च्या कार्यालयात तडजोड करण्यासाठी गेली नव्हती. तपासाचा भाग म्हणून पोलीसच तिला घटनास्थळी म्हणजेच WFI च्या कार्यालयात घेऊन गेले होते. विशेष म्हणजे कार्यालयात ब्रिजभूषण सिंह उपस्थित असताना महिला खेळाडूंना तिथे नेण्यात आलं. पोलिसांकडूनच महिला कुस्तीपटूंना घाबरवण्याचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप बजरंग पुनिया यांनी केला. ते ‘एएनआय’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यावेळी बजरंग पुनिया म्हणाले, “संबंधित महिला कुस्तीपटूला पोलीसच घटनास्थळी अर्थात कुस्ती महासंघाच्या कार्यालयात घेऊन गेले होते. त्याचवेळी महिला खेळाडू तडजोड करण्यासाठी ब्रिजभूषण यांच्याकडे गेली, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी चालवल्या. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे पोलीसच महिला कुस्तीपटूला खोटं बोलले. ब्रिजभूषण सिंह कार्यालयात उपस्थित असूनही ते कार्यालयात नाहीत, अशी खोटी माहिती पोलिसांनी दिली. पण ब्रिजभूषण सिंह कार्यालयातच होते, हे आम्हाला नंतर कळालं. पीडित मुलींना घाबरवण्याचं काम पोलिसांद्वारे केलं जात आहे, असं मला वाटतंय. त्यांना WFI च्या कार्यालयात घेऊन जायला नको होतं. आरोपी कार्यालयात उपस्थित असताना पीडित मुलींना तिथे नेण्यात आलं. त्यामुळे पोलिसांनी असं का केलं? हे पोलीसच सांगू शकतील.”