कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ. ऑलिम्पिकमध्येही भारताचा कुस्तीमधील आलेख यशाचे शिखर चढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुस्तीला ऑलिम्पिकमधून वगळण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यावेळी सारे कुस्ती विश्व एकवटले आणि खेळाच्या ढाच्यात काही बदल करत २०२० आणि २०२४मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे स्थान टिकवण्यात यश मिळवले. त्याचबरोबर सध्याची विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील भारताची चमकदार कामगिरी, कुस्ती विश्वचषकात मिळवलेले स्थान आणि यापुढचे भवितव्य या साऱ्या विषयांवर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीचे सरचिटणीस आणि माजी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बाळासाहेब लांडगे यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर भारतात कुस्तीचा सुवर्णदिन लवकरच उगवेल, असा विश्वासही प्रकट केला.
कुस्तीने २०२० आणि २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले, याबद्दल काय सांगाल ?
मुळात ऑलिम्पिक महासंघाने कुस्तीला वगळण्याचा व्यक्त केलेला मानस मला पटलाच नाही. जगातील १३० देश कुस्ती खेळतात, त्याचबरोबर कुस्ती बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक गर्दी करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मला तथ्य वाटले नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा एक भाग असल्याचे वाटते. पण ऑलिम्पिक महासंघाने सांगितल्यावर खेळात काही बदल करणे आणि आपली बाजू सक्षमपणे मांडणे, ही आमची जबाबदारी होती. त्यासाठी सारे कुस्ती विश्व एकवटले. खेळाच्या नियमांमध्ये काही बदल केले आणि सर्वानी एकत्रपणे आपली बाजू ऑलिम्पिक समितीपुढे मांडली, त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत जेवढी मते सॉफ्टबॉल आणि स्क्वॉश या खेळांना मिळून पडली, त्यापेक्षा जास्त मते एकटय़ा कुस्तीला मिळाली.
या निर्णयाचा भारताला कितपत फायदा होईल?
गेल्या दोन ऑलिम्पिकचा आपण विचार केला, तर भारताची कुस्तीमधील कामगिरी दिवसेंदिवस चांगली होताना दिसते आहे. बीजिंगपेक्षा लंडनमध्ये आपल्याला जास्त पदके मिळाली, भारतात कुस्तीचा सुवर्णदिन लवकरच उगवेल, असा विश्वास मला आहे. भारतीय मल्लांची कामगिरी पाहता येत्या काही वर्षांमध्ये भारत हा कुस्तीतली महासत्ता म्हणून नक्कीच पुढे येईल. सुशील कुमार, योगेश्वर दत्त, अमित कुमार, बजरंगसारखे चांगले मल्ल भारताकडे आहेत आणि येत्या काही वर्षांत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील सुवर्णपदक आपल्या पदरात नक्कीच पडेल, याची खात्री आहे.
सध्या सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील भारताच्या कामगिरीविषयी काय वाटते?
या स्पर्धेतील भारताची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. अमित कुमारने रौप्य, तर बजरंगने कांस्यपदक पटकावले आहे. हे दोघेही मल्ल जायबंदी नसते तर नक्कीच आपल्याला सुवर्णपदक मिळाले असते. दुखापत आणि आगामी राष्ट्रकुल स्पर्धेचा विचार करता सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या स्पर्धेत खेळले नसतानाही भारताने सहावा क्रमांक पटकावला आणि पहिल्यांदाच कुस्ती विश्वचषकात प्रवेश मिळवला. हे सारे भारतासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.
खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील एकाही मल्लाला त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही, याबद्दल काय सांगाल?
ही वस्तुस्थिती मला मान्य आहे. माझ्या मते महाराष्ट्रातील मल्ल मातीत अडकून पडले आणि त्यामुळे त्यांना खाशाबा यांच्याइतकी उंची गाठता आली नाही. कारण मातीतल्या आणि मॅटवरच्या कुस्तीमध्ये फारच फरक आहे. पण यासाठी आपण काहीही करत नाही, असे नक्कीच नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्या मदतीने आम्हाला मॅट मिळाले आहेत. सध्या महाराष्ट्रात २१ सामन्याची केंद्रे आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर कुस्ती ऑलिम्पिक मिशनलाही आम्ही सुरुवात केली आहे. या साऱ्या प्रयत्नांमुळे कुस्तीमध्ये महाराष्ट्र पुन्हा आपले गतवैभव मिळवून त्यापुढेही जाईल, असा मला विश्वास आहे.
भारताच्या कुस्तीमधील भवितव्याविषयी काय सांगाल?
सध्याच्या घडीला आपण कुस्तीमध्ये जागतिक स्तरावर चांगले नाव कमावले असून स्वत:ची ओळख पुन्हा निर्माण केली आहे. विदेशी मल्ल भारतीय मल्लांपुढे सावध असतात. त्याचबरोबर भारतात चांगले युवा मल्लही आहेत, ज्यांनी जागतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता कुस्तीमध्ये सुगीचे दिवस येतील, येत्या काही वर्षांत आपण ऑलिम्पिकमध्येही पदकांची लयलूट करताना नक्कीच दिसू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा