१ ते १० डिसेंबरदरम्यान नेपाळमधली काठमांडू शहरात दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचं (SAF Games) आयोजन करण्यात आलेलं आहे. या क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी इचलकरंजीच्या बाळासाहेब पोकार्डे याची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेबच्या या निवडीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्याची बाळासाहेब पोकर्डेची ही तिसरी वेळ आहे.
बाळासाहेब पोकर्डे हा सामन्य कुटुंबातील खेळाडू असून, आपल्या लहानपणापासूनच्या खो-खो प्रेमाच्या जोरावर त्याने एवढी मोठी मजल मारली आहे. आपल्या याच क्रीडा नैपुण्याच्या आधारावर बाळासाहेबला शासनाच्या क्रीडा विभागात काम मिळालं आहे. बाळासाहेब व्यतिरीक्त महाराष्ट्राच्या अभिनंदन पाटील, श्रेयस राऊळ, अक्षय गणपुले आणि सागर पोतदार या खेळाडूंचीही राष्ट्रीय संघात निवड झालेली आहे. शुक्रवारी हा संघ नेपाळला रवाना होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात महाराष्ट्राचे वर्चस्व दिसून येत आहे.
दुसरीकडे महिला खो-खो संघातही महाराष्ट्राच्या ५ मुलींनी राष्ट्रीय संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. प्रियांका भोपी, पौर्णिमा संकपाळ, ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार आणि काजल भोर यांची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. दिल्लीची नसरीन शेख महिला संघाचं नेतृत्व करेल. भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांनी ही निवड जाहीर केली आहे.