चेंडूशी छेडछाड केल्याचं प्रकरण (बॉल टॅम्परिंग) ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासाठी एक वाईट स्वप्न ठरू शकतं. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगमध्ये क्षेत्ररक्षक कॅमेरून बेनक्रॉफ्ट दोषी आढळल्यानंतर आयसीसीने कर्णधार स्मिथला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले. इतकेच नाही तर या कृतीला समर्थन देण्यासाठी त्याला मॅच फी इतकाच म्हणजेच १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला. पण अनेक माजी क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या या निर्णयावर टीका करत याहून कठोर कारवाई करायला हवी होती अशी मागणी केलीये. क्रिकेटविश्वातूनच नव्हे तर खुद्द ऑस्ट्रेलियामध्येही क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत असून दोषी खेळाडूंवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे. दोषी खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
कॅमेरून बेनक्रॉफ्ट याला मॅच शुल्काच्या ७५ टक्के दंड आयसीसीने ठोठावला असून ३ डिमेरिट अंक दिले आहेत. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका दोन्ही खेळाडूंवर ठेवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिस-या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला. याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी ही घटना आश्चर्यजनक आणि निराश करणारी म्हटलं. सकाळी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या वृत्तांमुळे आम्ही सर्वच निराश झालो, आमचा संघ खोटारडेपणा करू शकतो या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असं ते म्हणाले होते.
त्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरून बेनक्राफ्टने एका पिवळसर वस्तूला घासून चेंडू कुरतडला. टेलिव्हिजन चित्रीकरणात ही बाब स्पष्टपणे दिसली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग ही आमची रणनीतीच होती असे मान्य केले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलं.
या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत आहे.