दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट यांनी चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणी आता भारतीय खेळाडू हरभजन सिंहने उडी घेतली आहे. बॉल टॅम्परिंग केल्याचं मान्य केल्यानंतर आयसीसीने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या मानधनातली १०० टक्के रक्कम कापून घेत एका कसोटी सामन्याची बंदी घातली. याचसोबत बेनक्रॉफ्टच्या मानधनातली ७५ टक्के रक्कम कापून घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. मात्र ज्या खेळाडूने प्रत्यक्ष चेंडूशी छेडछाड केली त्याच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यामुळे हरभजन सिंहने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग : स्टिव्ह स्मीथ आणि डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी ?
२००१ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात हरभजन सिंहसह; सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास आणि दीप दासगुप्ता यांना आयसीसीने एका सामन्यासाठी निलंबीत केलं होतं. सौरव गांगुली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वारंवार अपील करत पंचांवर दबाव आणल्याचं कारण देत आयसीसीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तर सचिन तेंडुलकरवर याच कसोटी सामन्यात चेंडू कुरतडण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सामनाधिकारी माईक डेनिस यांनी सचिनवर कारवाई केली होती. यानंतर २००८ साली ऑस्ट्रेलियात गाजलेल्या मंकीगेट प्रकरणात हरभजन सिंहवर वर्णद्वेशी टिप्पणी केल्याचा ठपका ठेवत आयसीसीने हरभजनला ३ कसोटी सामन्यांसाठी निलंबीत केलं होतं. आपल्या ट्विटमधून हरभजनने या दोन प्रकरणांची आठवण करुन देत, आयसीसी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा न्याय का देते? असा सवाल विचारला आहे.
wow @ICC wow. Great treatment nd FairPlay. No ban for Bancroft with all the evidences whereas 6 of us were banned for excessive appealing in South Africa 2001 without any evidence and Remember Sydney 2008? Not found guilty and banned for 3 matches.different people different rules
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 25, 2018
कसोटी सामन्यादरम्यान टेलिव्हीजन कॅमेऱ्यात बेनक्रॉफ्ट चेंडूंशी छेडछाड करताना स्पष्टपणे दिसत होता. यावेळी बेनक्रॉफ्टने एक पिवळसर वस्तु आपल्या पँटमध्ये लपवल्याचंही स्पष्टपणे दिसतं होतं. मात्र सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार स्टिव्ह स्मिथने चेंडूशी छेडछाड करणं हा आमच्या रणनितीचा भाग असल्याचं मान्य केलं. मात्र चेंडूशी छेडछाड करुनही बेनक्रॉफ्टच्या मानधनातली केवळ ७५ टक्के रक्कम कापल्याने एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.