स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील एक वर्षांच्या बंदीचा निर्णय अत्यंत कठोर असल्याचे मत शेन वॉर्नने व्यक्त केले असतानाच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने या कारवाईचे समर्थन केले आहे. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ असून जे काही घडले ते दुर्दैवी होते. पण या खेळाडूंना दिलेल्या शिक्षेचा निर्णय योग्यच आहे, असे सचिनने सांगितले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ही कारवाई अत्यंत कठोर असल्याचे मत व्यक्त होत आहे. वॉर्नर आणि स्मिथला दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी विनंती ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी केली आहे. स्मिथ आणि वॉर्नरलाही नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी होती, याचा मी अजून विचार करतो. पण एका वर्षाची शिक्षा ही खूप कठोर आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने व्यक्त केले आहे.
दुसरीकडे सचिन तेंडुलकरने मात्र या कारवाईचे समर्थन केले. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे. हा खेळ प्रामाणिकपणेच खेळला पाहिजे. जे काही घडले ते दुर्दैवीच होते. पण त्या खेळाडूंवरील शिक्षेबाबतचा निर्णय योग्य आहे. खेळासाठी तो निर्णय गरजेचा होता. जिंकणे हे महत्त्वाचे असते, पण तो कोणत्या मार्गाने मिळवता हे त्याहून अधिक महत्त्वाचे असते, असे सचिनने म्हटले आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कारवाईनंतर स्मिथ आणि वॉर्नरला इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दोघांना आयपीएलमध्ये खेळण्यापासून मज्जाव केला आहे.