प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. या चढ-उतारांमुळेच खेळाडू परिपक्व होत असतो. पण कारकिर्दीतील या प्रवासात असे टप्पे येतात, ज्या वेळी खेळाडूंकडून अक्षम्य चुका होतात. त्यानंतर त्या खेळाडूच्या कारकिर्दीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. सध्या भारताची महिला बॉक्सर एल. सरिता देवी याच टप्प्यातून जात आहे. विजेंदर सिंग, सचिन तेंडुलकर, एस. सी. मेरी कोम, सानिया मिर्झा या दिग्गज खेळाडूंनी सरिता देवीला पाठिंबा दिला असून, क्रीडा मंत्रालय तसेच बॉक्सिंग इंडियाही तिच्यावरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरितावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) सध्या तात्पुरती बंदी घातली असली, तरी तिला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे संकेत खुद्द एआयबीएने दिल्यामुळे तिची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरितावरील बंदी योग्य की अयोग्य, याविषयी सध्या खल सुरू आहे.
इन्चोन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान कोरियाच्या जिना पार्क हिच्याविरुद्ध सरिताने सर्वाधिक पंचेस लगावून सामन्यावर वर्चस्व गाजवले. पण पंचांनी सरिताच्या बाजूने कौल देण्याऐवजी यजमान खेळाडूला विजयी घोषित केले. त्यामुळे सरिताचे रागावरील नियंत्रण सुटणे स्वाभाविक होते. त्यामुळे पदक वितरण सोहळ्याप्रकरणी व्यासपीठावर आल्यानंतर सरिताने नाराजी व्यक्त करत पदक प्रतिस्पर्धी खेळाडूला बहाल केले. सरिताच्या या कृत्याबद्दल अनेक खेळाडूंना तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत तिला पाठिंबा दिला. त्या वेळची तिची भावना उत्स्फूर्त होती. झाल्या प्रकाराबद्दल सरिताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि एआयबीए यांची रीतसर माफी मागितली. एआयबीएच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देतानाही तिने ‘यापुढे आपल्याकडून असे कृत्य घडणार नाही,’ असे नमूद केले. त्यानंतरही तिच्यावर आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. तिला योग्य न्याय एआयबीएकडून मिळणार की तिच्यावर अन्याय होणार, याची उत्सुकता आता भारतीय क्रीडाक्षेत्राला लागून राहिली आहे.
राष्ट्रकुल, आशियाई किंवा ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी कोणताही खेळाडू दिवस-रात्र मेहनत घेत असतो. अनेक गोष्टींचा त्याग करत असतो. या स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी जिवाचे रान करत असतो. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होऊ नये, असा निर्णय पंचांकडून अपेक्षित नसतो. पण आतापर्यंतच्या बॉक्सिंगच्या इतिहासात अनेक वादग्रस्त निर्णय पंचांकडून दिले गेले आहेत. त्यामुळे या लढतीनंतर विजयी म्हणून पंचांनी सरिताचा हात वरती करणे अपेक्षित होते. पण पंचांनी कोरियाच्या खेळाडूला विजयी घोषित केल्यामुळे पंचांची वाईट कामगिरी पुन्हा अधोरेखित झाली. याच स्पर्धेत मोंगोलिया आणि फिलिपिन्सच्या बॉक्सर्सनी पंचांच्या कामगिरीविषयी आक्षेप घेतला होता. पण या पंचांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम एआयबीए करत आहे. या लढतीसाठी भारताचे प्रशिक्षक आणि भारतीय पथकातील दोन पदाधिकारी उपस्थित होते. पण कुणीही सरिताची समजूत काढण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे सरिताच्या भावनांचा उद्रेक होणे स्वाभाविक होते.
मेरी कोमनंतर देशातील सर्वोत्तम महिला बॉक्सर असलेल्या सरिता देवीने भारतात बॉक्सिंग हा खेळ रुजवण्यास मोलाचा हातभार लावला आहे. सरिता देवीला मेरी कोमइतकी प्रसिद्धी लाभली नसली तरी तिचे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमधील योगदान वाखाणण्याजोगे आहे. सरावात कठोर मेहनत घेणाऱ्या शांत स्वभावाच्या सरिताने मेरी कोमप्रमाणे कधीही आदळआपट केली नाही किंवा व्यवस्थेविषयी आवाज उठवला नाही. फेब्रुवारी २०१३मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर सरिताने मेरी कोमकडून प्रेरणा घेत २० किलो वजन घटवून २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले. खडतर वेळापत्रक, कठोर प्रशिक्षण, अपुऱ्या सोयीसुविधा आणि पायाभूत सोयीसुविधांची वानवा या सर्वावर मात करत सरिताने गेली १५ वर्षे बॉक्सिंगमध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला होता. त्यामुळे एआयबीएने तिच्यावर कारवाई करण्याआधी तिची दीड दशकांची कारकीर्द लक्षात घ्यायला हवी.
डिसेंबर २०१२पासून भारतीय बॉक्सिंग असोसिएशनवर ऑलिम्पिक बंदी लादण्यात आली. त्यामुळे भारतीय बॉक्सर्सचे अतोनात नुकसान झाले. आशियाई स्पर्धेआधी बॉक्सिंग इंडिया ही भारताची अधिकृत संघटना म्हणून तात्पुरती मान्यता देण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाला काही दिवसांपूर्वीच कायमस्वरूपी मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीतही बॉक्सिंग इंडियाने सरिताविषयी पत्रव्यवहार करून एआयबीएला तिच्यावर कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. क्रीडा मंत्रालयानेही सरितावरील बंदी उठवण्यात यावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल, हे सांगता येणे कठीण आहे.
सरिताला अनेक चाहत्यांचा पाठिंबा मिळत असला तरी तिने केलेले कृत्य हे खेळभावनेनुसार तसेच नियमांचे उल्लंघन करणारे आहे. प्रत्येक खेळाडूला आपणच जिंकावे, असे वाटत असते. त्याचप्रमाणे त्याने पराभवही पचवायला हवा. सरिताप्रमाणे प्रत्येक खेळाडूने पराभवाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली की कोणतीही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडणार नाही. सरिताने वैयक्तिकपणे पराभवाबाबत दाद मागितली, हे योग्य केले. पण पदक सोहळ्यादरम्यान थेट पदक नाकारणे, हे खिलाडूवृत्तीचे लक्षण नाही. त्याविरुद्ध तिने बॉक्सिंग इंडिया, क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या मदतीने आवाज उठवायला हवा होता. जेणे करून यापुढे दुसऱ्या खेळाडूंवर अन्याय झाला नसता. सरितावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली तर तिची कारकीर्द संपुष्टात येईल. पण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि भारतीय बॉक्सिंगला ओळख मिळवून देणाऱ्या सरिता देवीची कामगिरी यापुढेही सर्वाच्या स्मरणात राहील.
    

Story img Loader