बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, नवोदीत अफगाणिस्तानने आश्वासक खेळ केला आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस अफगाणिस्तानने ५ गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावांपर्यंत मजल मारली आहे. रेहमत शाहने १०२ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून शतक झळकावणारा रेहमत पहिला फलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इब्राहीम झरदान आणि एहसानउल्ला ही अफगाणी सलामी जोडी झटपट माघारी परतली. यानंतर रेहमत शाह आणि हशमतुल्ला शहिदीमध्ये छोटेखानी भागीदारी झाली. ही जोडी अफगाणिस्तानला स्थैर्य मिळवून देणार असं वाटत असतानाच मेहमदुल्लाने शहिदीला माघारी धाडलं. केवळ ७७ धावांमध्ये अफगाणिस्तानचे ३ फलंदाज माघारी परतले होते.

यानंतर मैदानावर आलेल्या असगर अफगाण आणि रेहमत शाह यांनी अफगाणिस्तानचा डाव सावरला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. यादरम्यान रेहमत शाहने आपलं शतकंही झळकावलं. नईम हसनने रेहमत शाहला सौम्या सरकारकडे झेल द्यायला भाग पाडत अफगाणिस्तानला चौथा धक्का दिला. रेहमत शाहने १८७ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

यानंतर मैदानात आलेला अनुभवी मोहम्मद नबीही नईम हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. तो भोपळाही फोडू शकला नाही. यानंतर असगर अफगाण आणि अफझर झझाईने पुन्हा एकदा भागीदारी रचत अफगाणिस्तानचा डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा असगर अफगाण नाबाद ८८ तर झझाई नाबाद ३५ धावांवर खेळत होता. बांगलादेशकडून पहिल्या दिवसाअखेरीस तैजुल इस्लाम, नईस हसन यांनी प्रत्येकी २-२ तर मेहमदुल्लाने १ बळी घेतला.