Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषकातून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे तो बांगलादेशचा शेवटचा साखळी सामना असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी लढतीला मुकणार आहे. शाकिब-अल-हसनने मॅथ्यूजविरुद्ध वेळकाढूपणा करत असल्याचे अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित केले. मॅथ्यूजनेही शाकिबला अपील मागे घेण्याची मागणी केली, पण शाकिबने ते मान्य केले नाही. या घटनेमुळे सध्या तो खूप चर्चेत आहे.

श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर एक्स-रेमध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाल्याची पुष्टी केली, ज्यामुळे तो ११ नोव्हेंबर रोजी पुण्यात बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातून बाहेर पडला आहे. राष्ट्रीय संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम खान यांनी दुखापतीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “शाकिबला बांगलादेश डावाच्या सुरुवातीला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती, परंतु त्याने सपोर्टिव्ह टेप आणि वेदनाशामक औषध घेत फलंदाजी सुरू ठेवली.”

फिजिओ पुढे म्हणाले. “सामन्यानंतर त्याचा दिल्लीत तात्काळ एक्स-रे करण्यात आला ज्यात त्याच्या डाव्या बोटाच्या मध्यभागी फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी केली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील अशी माहिती देंण्यात आली आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी तो आज बांगलादेशला रवाना होईल.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पात्र होण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल

बांगलादेश २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पात्रतेसाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल. अव्वल ७ संघ आणि यजमान राष्ट्र पाकिस्तान २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

बांगलादेश सध्या गुणतालिकेत ८व्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयामुळे त्यांची आयसीसी स्पर्धेसाठी पात्रता निश्चित होईल. बांगला टायगर्सची या स्पर्धेत खूप निराशाजनक कामगिरी झाली आहे. सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक वाईट घटना पाहायला मिळाली, जेव्हा शाकिबच्या अपीलनंतर श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला सामन्यात ‘टाइम आऊट’ देण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर पर्यायाने बांगलादेश संघावर खूप टीका होत आहे.

बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला

बांगलादेशने श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्व १० गडी गमावून २७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ४१.१ षटकात सात विकेट्स गमावून २८२ धावा केल्या आणि सामना तीन गडी राखून जिंकला.

हेही वाचा: BAN vs SL: सामन्यानंतर पडले अँजेलो मॅथ्यूजच्या टाईम आऊटचे पडसाद, खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास दिला नकार; पाहा Video

आता बांगलादेश आणि इंग्लंडनंतर श्रीलंकाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीतील उर्वरित दोन जागांसाठी पाच संघ दावा करत आहेत. मात्र, यापैकी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दावा मजबूत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स हे संघ नशिबावर अवलंबून आहेत.

Story img Loader