Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या ३८व्या सामन्यात असे काही घडले, जे पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी क्रिजवर आला, मात्र पंचांनी त्याला ड्रेसिंगरूममध्ये परत जाण्यास सांगितले. पंचांनी मॅथ्यूज बाद झाल्याचे ठरवले. पंच आणि अँजेलो मॅथ्यूजमध्ये बराच वेळ वाद झाला, पण शेवटी त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. मॅथ्यूजची फलंदाजीला येण्याची वेळ संपली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजाने फलंदाजी करायला येण्यासाठी वेळ मारून नेण्याची ही पहिलीच घटना आहे.
मॅथ्यूजला टाइमआउट घोषित करण्यात आले
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट म्हणून बाद घोषित करण्यात आले. समरविक्रमा बाद झाल्यानंतर निर्धारित वेळेत फलंदाजी करण्यासाठी मॅथ्यूज आला नाही. नियमानुसार, मॅथ्यूजला दोन मिनिटांत क्रीजवर पोहचून तीन मिनिटांत चेंडू खेळावा लागणार होता. त्यात तो अपयशी ठरला म्हणून मॅथ्यूजला टाईमआऊट म्हणण्यात आले. जर बांगलादेश संघाने अपील मागे घेतले असते तर मॅथ्यूजला खेळण्याची संधी मिळू शकली असती, पण शाकिब-अल-हसनने तसे केले नाही.
मॅथ्यूज जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याने चुकीचे हेल्मेट आणले होते. त्याने पर्यायी खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. त्यामुळे पंच आणि बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. शाकिबने श्रीलंकेकडून वेळ काढूपण सुरु आहे अशी तक्रार केली. यानंतर पंचानी मॅथ्यूजला बाद घोषित केले. मॅथ्यूजने शाकिब-अल-हसनशी संवाद साधला. शाकिबने अपील मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर मॅथ्यूज रागाने पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने हेल्मेट आणि हातमोजे डगआऊटमध्ये फेकले. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडही या संपूर्ण घटनेने चांगलेच संतापलेले दिसले.
मेंडिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्याशी चर्चा केली. या दोघांसोबत चोथे पंचही होते. हथुरुसिंहाच्या हातात काहीच नव्हते कारण, फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. हे पाहून पुन्हा मॅथ्यूज रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला आणि त्याने हेल्मेट आणि बॅट फेकून दिली. जेव्हा धनंजय डी सिल्वा फलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेचा डाव पुढे सरकला. या संपूर्ण घटनेवर आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.
नियम काय सांगतो?
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर येणारा फलंदाज टाईम आऊट होईल. म्हणजेच, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतो. या बदलासाठी तीन मिनिटं मिळतात. पॅव्हेलियनमध्ये तयार असलेल्या फलंदाजाला क्रीझवर पोहोचण्यासाठी हा वेळ मिळतो. त्यावेळेत फलंदाज जर मैदानात खेळायला पोहोचला नाही तर त्याला टाईम आऊट दिलं जातं.
क्रिकेटमध्ये किती प्रकारे फलंदाज बाद होतो?
१.बोल्ड (त्रिफळाचीत)
२.कॉट (झेलबाद)
३.लेग बिफोर विकेट (पायचीत)
४.रनआऊट (धावबाद)
५.स्टंपिंग (यष्टीचीत)
६.रिटायर्ड (निवृत्त)
७.हिट द बॉल ट्वाईस
८.हिट विकेट (स्वत:च्या चुकीने बाद होणे)
९.ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड
१०.टाईम आऊट
११.हँडल द बॉल