बंगळुरू फुटबॉल क्लबने पदार्पणातच आय-लीग या देशातील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावत भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहिला. कर्णधार सुनील छेत्रीच्या सुरेख कामगिरीमुळे बंगळुरू एफसीने डेम्पो स्पोर्ट्स क्लबवर ४-२ असा विजय मिळवत ही किमया साधली.
अन्य मातब्बर संघांचे आव्हान मोडीत काढून जेतेपदावर नाव कोरण्यासाठी बंगळुरू फुटबॉल क्लबला या सामन्यात विजयाची आवश्यकता होती. बंगळुरूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व गाजवले. सीन रूनी (दुसऱ्या मिनिटाला), रॉबिन सिंग (५६व्या मिनिटाला), जॉन मेयोनगर (७९व्या मिनिटाला) आणि सुनील छेत्री (९०व्या मिनिटाला) यांनी गोल करत बंगळुरूच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. डेम्पोकडून रॉबेटरे सिल्व्हा (८२व्या मिनिटाला) आणि रोमियो फर्नाडेस (८९व्या मिनिटाला) यांनी अखेरच्या क्षणी गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण तोपर्यंत बंगळुरूने सामन्यावर अधिराज्य गाजवले होते.
बंगळुरूला गेल्या दोन सामन्यांत विजयाची आवश्यकता होती. बंगळुरूने दोन्ही सामने जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे बंगळुरूचे ४४ गुण झाले असून स्पर्धेची एक फेरी शिल्लक असली तरी त्यांच्याकडे निर्णायक आघाडी आहे. आता ईस्ट बंगाल आणि साळगांवकर फुटबॉल क्लब यांच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चुरस रंगणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी विजेत्या बंगळुरू फुटबॉल क्लबचे अभिनंदन केले आहे.

Story img Loader