बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. अशातच एका चाहत्याला शाकिब अल हसनने कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक आठवड्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.
बांगलादेशमध्ये नुकतेच सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. मतदान केंद्रावर पोहोचलेल्या शाकिबला चाहत्यांनी गराडा घातला. यावेळी एका चाहत्याने शाकिबचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शाकिबने आपला संयम गमावला आणि चाहत्याला कानशिलात लगावली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या शाकिबने सार्वत्रिक निवडणुकीत मोठं यश प्राप्त केलं आहे. शाकिबने दीड लाख मते मिळवत निवडणुकीत विजय मिळवला आहे. राजकारणातील प्रवेशानंतरही शाकिब क्रिकेट खेळणे सुरूच ठेवणार आहे. राजकारणासह क्रिकेटही खेळणार असल्याचं शाकिबने स्पष्ट केलं होतं.
शाकिब अल हसन हा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आहे. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेत शाकिब हसन बांगलादेशचा कर्णधार होता. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघानं अत्यंत निराशजनक कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशला ९ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता.