PAK vs BAN 2nd Test Highlights in Marathi: बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत इतिहास घडवला आहे. बांगलादेशने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. बांगलादेशने पाकिस्तानला रावळपिंडी कसोटीत ६ विकेट्सने पराभूत केलं. या पराभवासह बांगलादेशने २-० ने मालिका आपल्या नावे केली आहे. पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरूद्ध १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. ज्याप्रकारे बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदा कसोटीत पराभूत करत इतिहास घडवला त्याचप्रमाणे आता त्यांना कसोटी मालिका आपल्या नावे करत मोठा इतिहास घडवला आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाने घडवला इतिहास
पाकिस्तानच्या कसोटी इतिहासात प्रथमच बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. या मालिकेत त्यांनी प्रथमच कसोटीत पराभवाचा विक्रमही केला. पाकिस्तान क्रिकेटसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानला खराब फिल्डिंग आणि साधारण फलंदाजी या बाबींचा मोठा फटका बसला. आतापर्यंत मोठे संघ पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करायचे, पण आज बांगलादेशसारख्या संघानेही पाकिस्तानचा पराभव केला आहे. बांगलादेशसारखा छोटा संघ क्रिकेटच्या या फॉरमॅटवर जास्त लक्ष केंद्रित करत नाही, पण तरीही त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व राखले आणि मालिका २-० अशी जिंकली.
दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २७४ धावा करत सर्वबाद झाले. ज्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. तर बांगलादेशचा संघ २६२ धावा करत सर्वबाद झाला. बांगलादेशकडून लिटन दासने १३८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर मेहदी हसनने ७८ धावांची निर्णायक खेळी केली. १२ धावांच्या आघाडीसह पाकिस्तानने आपला दुसरा डाव सुरू केला. पण संघ १७२ धावा करत सर्वबाद झाला. यासह बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान मिळाले होते जे बांगलादेशने ६ विकेट्स राखत सहज गाठले.
बांगलादेशने पाकिस्तानवर असा मिळवला विजय
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशच्या संघाने दमदार सुरुवात केली. झाकीर हसन (४०) आणि शादमान इस्लाम (२४) यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने ३८ धावांची तर मोमिनुल हकने ३४ धावांची खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेले. हे दोघेही बाद झाल्यावर मुशफिकुर रहीम आणि माजी कर्णधार शकीब अल हसन यांनी अनुक्रमे नाबाद २२ आणि नाबाद २१ धावांची खेळी खेळून बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बांगलादेशने ५६ षटकांत ४ गडी गमावून १८५ धावा करत लक्ष्य गाठले.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेश संघाने जिंकला होता. पहिला सामना बांगलादेशने १० गडी राखून जिंकला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही बांगलादेश संघाने चांगली कामगिरी केली. दरम्यान, रावळपिंडीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने एक मोठा विक्रम केला आहे.
बांगलादेश संघाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानला ऑलआऊट केलं. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी या सर्व १० विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाजांनीही यात योगदान दिले. बांगलादेशच्या तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी पाकिस्तानविरुद्ध विकेट घेतल्या. या तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. यादरम्यान हसन महमूदने पाच विकेट घेतल्या. नाहिद राणाने चार आणि तस्किन अहमदने एक विकेट घेतली.
© IE Online Media Services (P) Ltd