IND W vs BAN W: भारताचा महिला संघ आणि बांगलादेशचा महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेचा निकाल १-१ असा बरोबरीत सुटला. मालिकेतील तिसरा सामना टाय झाल्यामुळे भारतीय महिला खेळाडू खूपच नाराज दिसल्या. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यातील अंपायरिंगवर चांगलीच संतापली होती. शनिवारी (२२ जुलै) ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघादरम्यान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मोठा वाद झाला.
विजयासाठी २२६ धावांचा पाठलाग करताना, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला अंपायरने LBW आऊट केले, त्यानंतर तिने या निर्णयाविरोधात अंपायरविरुद्ध दाद मागितली. तरीसुद्धा तिच्या विरुद्ध निर्णय देण्यात आला. मग तिने अंपायरविरुद्ध नाराजी व्यक्त करत तिचा संयम गमावला आणि डगआउटमध्ये परत जाण्यापूर्वी तिने तिची बॅट स्टंपवर फेकून मारली. हरमनप्रीत कौरने ड्रेसिंग रुममध्ये जाताना अंपायरशी हुज्जत घातली आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर तिने प्रेक्षकांच्या दिशेने अंगठा दाखवत मी बरोबर होते असे सांगितले. हरमनप्रीतच्या म्हणण्यानुसार चेंडू तिच्या पॅडला लागण्यापूर्वी बॅटला स्पर्श केला होता. पण तो चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने पकडला.
हरमनप्रीत कौरने अंपायरिंगवर प्रेझेंटेशन दरम्यान टीका केली
तणावपूर्ण भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना टाय झाला. पावसामुळे सामना लांबला आणि वेळेअभावी सुपर ओव्हर झाला नाही आणि परिणामी भारत महिला विरुद्ध बांगलादेश महिला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.
सामन्यानंतर, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर संपूर्ण एकदिवसीय मालिकेत खराब अंपायरिंग मानकांवर टीका करताना दिसली. मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये तिने या मुद्द्यावर खरमरीत शब्दात प्रतिक्रिया दिली. “या खेळातून खूप काही शिकायला मिळाल्याचे हरमनप्रीतने सांगितले. क्रिकेटशिवाय अंपायरिंगचे जे प्रकार तिथे घडत होते, त्याचे आम्हाला खूप आश्चर्य वाटले. पुढच्यावेळी जेव्हाही आम्ही बांगलादेशला येणार आहोत, तेव्हा आम्हाला खात्री करावी लागेल की, आम्ही अशा प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जाऊ आणि त्यानुसार स्वतःला तयार करू. आमचे सामन्यावर चांगले नियंत्रण होते पण, मी आधी म्हटल्याप्रमाणे काही खराब अंपायरिंगचे निर्णय आमच्या विरोधात गेले. अंपायरने दिलेल्या काही निर्णयांमुळे आम्ही खरोखर निराश झालो आहोत.”
हरमनप्रीतच्या कृतीवर बांगलादेशच्या कर्णधाराने सूचक विधान केले
सामन्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अंपायरच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. यावर, बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानानेही तिच्या कृतीवर खोचक टीका केली. ती म्हणाला की, “भारतीय कर्णधाराने शिष्टाचाराने बोलायला हवे होते.” या घटनेबद्दल विचारले असता, पत्रकार परिषदेत निगार म्हणाली, “ही संपूर्णपणे त्यांची समस्या आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली कृती करून दाखवू शकली असती. काय झाले? ते मी सांगू शकत नाही, पण माझ्या टीमसोबत तिथे (छायाचित्रासाठी) असणे योग्य वाटले नाही. ते वातावरण योग्य नव्हते. म्हणून आम्ही परत निघालो. क्रिकेट हा शिस्तीचा आणि आदराचा खेळ आहे. प्रत्येकाला वागण्या-बोलण्याचे भान हवे.”