India vs Bangladesh Match Wide Ball Controversy: भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा १७ वा सामना गुरुवारी पुण्यात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. या सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये एका वाईड बॉलवर बराच गदारोळ झाला. मात्र, मैदानी पंच रिचर्ड केटलबरो यांनी हा बॉल वाइड दिला नाही. यानंतर विराट कोहलीने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. एकीकडे बांगलादेशच्या गोलंदाजाने विराटचे शतक रोखण्यासाठी जाणूनबुजून वाईड बॉल टाकला का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याबाबत संघाचा कार्यवाहक कर्णधार नजमुल हसन शांतो याने पत्रकार परिषदेत उत्तर देताना सर्व सांगितले.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
खरंतर विराट कोहली ९७ धावांवर खेळत होता आणि भारताला विजयासाठी २ धावांची गरज होती. या स्थितीत बांगलादेशचा गोलंदाज नसुम अहमदने बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला. हा बॉल स्पष्टपणे वाईड दिसत होता पण अंपायर केटलबरो यांनी तो वाईड दिला नाही. यानंतर बॉल वाईड आहे की नाही यावर बरेच वाद झाले. लोकांनी त्यांच्या पद्धतीने एमसीसीचे नियमही उद्धृत केले. पण दुसऱ्या कोनातून बघितले तर बांगलादेशच्या खेळाडूने मुद्दाम वाईड बॉल टाकला का? यासंदर्भात पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार नजमुल हसन शांतो यालाही प्रश्न विचारण्यात आला.
कर्णधार नजमुल हसन शांतोने सांगितले संपूर्ण सत्य –
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या कर्णधाराला वेगवेगळ्या पत्रकारांनी याबाबत दोनदा विचारले. यापूर्वी प्रसारमाध्यमांनी विराटचे शतक रोखण्यासाठी जाणूनबुजून वाईड बॉल टाकण्याचे काही नियोजन होते का? असा सवाल केला. यावर शांतो म्हणाला, ‘नाही, अशी कोणतीही योजना नव्हती. कोणत्याही गोलंदाजाला वाईड बॉल टाकायचा नसतो.” त्यानंतर आणखी एका पत्रकारानेही बांगलादेशी कर्णधाराला हाच प्रश्न विचारला. यावेळी शांतो जरा जोरात म्हणाला, “नाही नाही नाही… आम्ही यात जाणूनबुजून काही केलं नाही. आम्हाला पूर्णपणे योग्य खेळ खेळायचा होता.”
हेही वाचा – AUS vs PAK: शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये केले सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल
पंचांच्या निर्णयावरून पेटला वाद –
पंच रिचर्ड केटलबरो यांच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. टी-२० विश्वचषक २०२२ चे व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागले आहेत ज्यात नवाजचा चेंडू अश्विनसमोर वाईड देण्यात आला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, अनेक लोक वेगवेगळ्या एमसीसी नियमांचा हवाला देत आहेत. पण नियम पाळले तर अश्विनच्या चेंडूला वाइड द्यायला हवे होते आणि विराटच्या चेंडूलाही वाईड द्यायला हवे होते. यावर वाद सुरू आहे, आयसीसीकडून या नियमाबाबत काही स्पष्टीकरण आणि प्रतिक्रिया येते की नाही हे पाहणे बाकी आहे.