ढाका : बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक मुशफिकूर रहीमने रविवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे मुशफिकूरने सांगितले.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होत असलो, तरी फ्रेंचाइझी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्यास आपण नक्कीच विचार करू, असेही ३५ वर्षीय मुशफिकूरने स्पष्ट केले आहे. मुशफिकूरने ‘ट्विटर’वरून निवृत्तीबाबतची घोषणा केली.

यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे साखळी फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले. बांगलादेशचा संघ मायदेशी परतल्यावर मुशफिकूरने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

गेल्या १० ट्वेन्टी-२० सामन्यांत मुशफिकूरला केवळ तीन वेळा दोन आकडी मजल मारता आली. आशिया चषकातील दोन सामन्यांत स्पर्धेत तो केवळ पाच धावा करू शकला.

मुशफिकूरने बांगलादेशसाठी १०२ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळताना ११५.०३च्या धावगतीने १५०० धावा केल्या. शाकिब अल हसन आणि महमुदुल्ला यांच्यासह मुशफिकूर हा बांगलादेशच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ मानला जातो.

Story img Loader