India vs Bangladesh 2nd Test Updates: भारत बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ लंच ब्रेकनंतर थांबवण्यात आला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा सामना होणार नसल्याचे पंचांनी जाहीर केले. पण तत्त्पूर्वी लंच ब्रेक होण्यापूर्वी कानपूर स्टेडियममध्ये मोठी घटना घडली. बांगलादेशी क्रिकेट चाहत्याला प्रेक्षक गॅलरीत मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या. मात्र या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बांगलादेशचा हा चाहता स्वत:ला ‘सुपर फॅन रॉबी’ म्हणतो. घटनेच्या वेळी त्याने वाघाचा पोशाख परिधान केला होता आणि तो स्टँड सीच्या बाल्कनीत बसला होता. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (यूपीसीए) अधिकाऱ्याने सांगितले की, रॉबी घटनांचा नेमका क्रम सांगू शकला नाही, पण त्याला खूप वेदना होत होत्या. माध्यमांशी बोलताना त्याने एका भांडणात कोणीतरी पोटात मुक्का मारल्याचे संकेत दिले.
‘सुपरफॅन रॉबी’ ने सांगितले की सुमारे १५ लोकांच्या जमावाने त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला. मात्र, यूपी पोलिसांनी रॉबीचा दावा फेटाळून लावला. डीहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध झाल्याचे यूपी पोलिसांचे म्हणणे आहे, त्याच्यावर कोणीही हल्ला केलेला नाही. रॉबीच्या म्हणण्यानुसार ही घटना लंच ब्रेकच्या आधी घडली.
बांगलादेशचा चाहता टायगर रॉबीने सांगितलं त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं?
रॉबीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ‘सकाळपासून गर्दीतील काही जण माझ्याबरोबर गैरवर्तन करत होते. लंच ब्रेकनंतर मी नजमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांची नावे घेत त्यांना चिअर करत होतो. त्यापैकी काहींनी मला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, माझा मॅस्कॉट (वाघ) आणि माझा झेंडा फाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जेव्हा मी विरोध करायला लागलो तेव्हा त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘डिहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध झाला. त्याच्यावर कोणीही हल्ला केला नाही.
यूपीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तो स्टँडमधून बाहेर आला तेव्हा त्याला वेदना होत होत्या. तो बेशुद्ध होऊ लागला. त्याला बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली पण तितक्यात तो पडला.’ ग्रीनपार्क स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रॉबीला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्याच्यासाठी रूग्णवाहिका बोलवण्यात आली.
पोलिस अधिकारी पुढे म्हणाले, ‘आम्हाला माहित नाही की त्याला कोणी मारले की नाही. चाहत्यांवर नजर ठेवण्यासाठी त्या स्टँडमध्ये एक हवालदार असतो. रॉबी काय बोलत होता हे आम्हाला समजू शकले नाही. कदाचित त्याला वेदना होत असतील. रुग्णवाहिका येण्यास थोडा वेळ लागत होता, त्यामुळे स्टेडियमच्या वैद्यकीय पथकाने त्याला जवळच्या सुविधा केंद्रात नेले.
बाल्कनीत उभा असलेला रॉबी हा बांगलादेश क्रिकेट संघाचा एकमेव चाहता होता. सुरक्षेच्या कारणास्तव बाल्कनी प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आली होती. त्याने सांगितले की, ‘एका पोलिसाने मला त्या ब्लॉकवर उभे राहू नकोस असे सांगितले. मी फक्त तिथे उभा होतो कारण मला भीती वाटत होती. कारण गर्दीतील काही जण मला सकाळपासून शिव्या देत होते. मी बॉलीवूड चित्रपटही पाहिले आहेत त्यामुळे मला शिव्या कळतात. सकाळपासून ते सतत शिवीगाळ करत होते. तुमच्या संघाला, तुमच्या देशाला पाठिंबा देणे गुन्हा आहे का?’