वेस्ट इंडिजचा १९ वर्षांखालील संघ वास्तव्यास असलेल्या चित्तगांव येथील हॉटेलजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर वेस्ट इंडिजने बांगलादेशचा दौरा रद्द केल्यानंतर आता पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी भीती व्यक्त केली आहे.
१६ देशांचा सहभाग असलेली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान रंगणार आहे. ‘‘जर ही परिस्थिती अशीच राहिली तर कोणतीही प्रतिष्ठेची स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करणे कठीण जाणार आहे. एखादा बलाढय़ संघही बांगलादेशच्या दौऱ्यावर येणार नाही,’’ असे हसन म्हणाले.
राजकीय अस्थिरतेमुळे राजधानी ढाका, चित्तगांव आणि सियालहेट या शहरांना प्रमुख धोका आहे. गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या शिष्टमंडळाने बांगलादेशला भेट दिल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले होते. ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास हसन यांनी व्यक्त केला.