Shakib Al Hasan confirms rift with Tamim Iqbal Marathi News : नेदरलँडविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशच्या विश्चचषक स्पर्धा २०२३ मधलं उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा मंदावल्या आहेत. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने संघातले अंतर्गत वाद हे बांगलादेशच्या विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीमागचं प्रमुख कारण असल्याचं वक्तव्य केलं आहे. शाकिबने त्यांच्या संघात वाद असल्याची कबुली दिली आहे. तसेच तो म्हणाला की, संघातल्या अंतर्गत वादामुळे आमच्या संघाचं मनोबल खचलं असावं.
विश्वचषक स्पर्धा २०२३ ची सुरुवात होण्याआधी तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन या दोघांमध्ये भांडण झालं होतं. तमिमने संघ व्यवस्थापनाला सांगितलं होतं की तो स्पर्धेत केवळ पाचच सामने खेळू शकतो. त्यामुळे शाकिबने तमिमचा संघात समावेश करण्यास नकार दिला होता. दोघांमधील भांडणाची समाज माध्यमांवर चर्चाही झाली होती. शाकिबच्या मते त्याचं आणि तमिमचं भांडण हे संघाच्या खराब कामगिरीमागचं कारण असू शकतं. याबद्दल त्याने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया दिली.
शाकिब म्हणाला, त्या भांडणाचा संघावर परिणाम झाला असावा. आपल्याला माहिती नसतं की, कुठल्या खेळाडूच्या डोक्यात काय चाललंय. परंतु, त्या भांडणाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला असेल, हा दावा मी फेटाळणार नाही.
विश्वचषक स्पर्धेतला लिंबूटिंबू संघ म्हणून ज्या नेदरलँडचा अनेकांनी उल्लेख केला, त्याच नेदरलँडच्या संघाने शनिवारी कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेशला नमवलं. काही दिवसांपूर्वी नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची किमया केली होती. दरम्यान, नेदरलँडविरुद्धच्या पराभवासह बांगलादेशसाठी बाद फेरीचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. नेदरलँडने बांगलादेशला २३० धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, बांगलादेशचा संघ ४२.२ षटकांत १४२ धावांवर गारद झाला.आतापर्यंत बांगलादेशला ६ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर नेदरलँडने ६ पैकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे.