Bangladesh ex Captain Tamim Iqbal Heart Attack Health Update: बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी सकाळी सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला ढाका पासून दूर असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तमिम ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमधील सामना खेळत होता. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना खेळला जात आहे.

सामन्यादरम्यान इक्बालच्या छातीत अचानक दुखू लागले. सुरूवातीला त्याला एअरलिफ्ट करून ढाका येथे आणण्याची तयारी सुरू होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. यानंतर त्याला फाजिलातुनेसा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पोर्टस्टारने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशीष चौधरी यांचा हवाला देत सांगितले की, “सुरूवातीला त्यांची स्थानिक रुग्णालयात तपासणी करण्यात आली, जिथे ह्रदयविकाराचा सौम्य त्रास झाल्याचा संशय होता. यानंतर त्याला ढाका येथे नेण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हेलिपॅडच्या दिशेने जात असताना त्याला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याला परत न्यावे लागले. वैद्यकीय अहवालांनी नंतर पुष्टी केली की त्याला मोठा हृदयविकाराचा झटका आला होता.”

क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितलं की, “आपल्या सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. तो सध्या निरीक्षणाखाली आहे आणि वैद्यकीय पथक तो बरा व्हावा यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.” तमिमच्या तब्येतीबाबत पुढील काही अपडेट समोर आलेले नाहीत. त्याला ढाकामध्ये नेणं आता शक्य नसल्याचेही डॉक्टर म्हणाले कारण त्याची स्थिती सध्या नाजूक आहे.

तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, नंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर तमीमने निवृत्ती मागे घेतली. तमिमला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशकडून खेळण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने ही विनंती मान्य करण्यास नकार देत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली. तमिमने बांगलादेशसाठी ७० कसोटी, २४३ एकदिवसीय आणि ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत ५१३४ धावा, एकदिवसीय सामन्यात ८३५७ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७७८ धावा केल्या.