Bangladesh a historic performance by defeating New Zealand : बांगलादेश संघाने पुन्हा एकदा आपल्या कागिरीने क्रिकेटविश्वाला आश्चर्यचकित केले आहे. बांगलादेशने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात शानदार विजय नोंदवला आहे. बांगलादेश संघाने किवीजचा ५ विकेटने पराभव केला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला घरच्या मैदानावर टी-२० सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक विजयाचा हिरो मेहदी हसन ठरला. न्यूझीलंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १८.४ षटकांत ५ गडी गमावून १३७ धावा काढून विजयावर शिक्कमोर्तब केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपियर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या एका धावेवर किवी संघाच्या तीन विकेट पडल्या. मेहदी हसनने पहिल्याच षटकात टीम सेफर्टला (०) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पुढच्याच षटकात शॉरीफुल इस्लामने फिन ऍलन (१) आणि ग्लेन फिलिप्स (०) यांना एका पाठोपाठ बाद केले.

नीशमच्या खेळीने उभारला सन्मानजनक धावसंख्या –

या खराब सुरुवातीनंतर डॅरिल मिचेल (१४) आणि मार्क चॅपमन (१९) यांनी न्यूझीलंडसाठी काही प्रमाणात धावा करण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. यानंतर जेम्स नीशमने २९ चेंडूत ४८ धावा करत किवी संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात मदत केली. त्याला मिचेल सँटनर (२३) आणि अॅडम मिल्ने (१६) यांनीही चांगली साथ दिली. अशाप्रकारे, निर्धारित २० षटकांत न्यूझीलंड संघाला ९ गडी गमावून १३४ धावा करता आल्या. बांगलादेशकडून शरीफुलने तीन, मेहदी हसन आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी दोन आणि तंजीम आणि रिशादने प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा – IND vs SA 1st Test : केएल राहुलने सेंच्युरियनमध्ये दुसरे शतक झळकावत मोडले अनेक मोठे विक्रम

१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने संघाने १३ धावांवर रॉनी तालुकदार (१०)ची विकेट गमावली. यानंतर कर्णधार शांतो (१९) बाद झाला. बांगलादेशने ठराविक अंतराने नक्कीच विकेट गमावल्या परंतु लक्ष्याकडे सातत्याने वाटचाल सुरू ठेवली. सौम्या सरकारचे (२२), तौहीद हद्दूय (१९) एकूण ९६ धावांवर आणि अफिफ हुसेनचे (१) अशा विकेट्स गमावल्या. बांगलादेशच्या ९७ धावांवर ५ विकेट्स पडल्यानंतर सामन्यात थोडा रोमांच निर्माण झाला होता, पण येथून मेहदी हसनने १६ चेंडूत १९ धावांची खेळी खेळली आणि सलामीवीर लिटन दास (४२) याला चांगली साथ दिली आणि सहाव्या विकेटसाठी नाबाद ४० धावा केल्या. या दोघांनी भागीदारी करून बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या १८ टी-२० सामन्यात ४ विजय मिळवले आहेत. तसेच वनडे प्रकारात बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध ४५ सामन्यांपैकी ११ लढतीत विजय मिळवला आहे. कसोटी प्रकारात बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध १९ कसोटी खेळल्या असून यापैकी २ मध्ये विजय मिळवला आहे. न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर चीतपट करण्याची किमया बांगलादेशला साधली आहे. गेल्यावर्षी माऊंट मांघनाई इथे झालेल्या कसोटीत बांगलादेशने विजय मिळवला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजे २३ डिसेंबरला झालेल्या वनडेत बांगलादेशने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. टी-२० प्रकारात न्यूझीलंडचा संघ धोकादायक समजला जातो, पण बांगलादेशने आज याही प्रकारात दिमाखदार विजय मिळवला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh team a historic performance by defeating new zealand by 5 wickets in the first ever t20 match in the country vbm
Show comments