राजकीय अस्थर्यामुळे बांगलादेशमध्ये सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे, परंतु तरीही पुढील महिन्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्येच होणार आहे, असे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) शनिवारी जाहीर केले.
‘‘बांगलादेशमध्ये नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसारच आशिया चषक स्पर्धा होणार आहे. स्पध्रेच्या ठिकाणात कोणताच बदल होणार नाही,’’ असे आशियाई क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रफूल हक यांनी सांगितले.
५ जानेवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बांगलादेशची राजधानी ढाका येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वातावरणात आशिया चषक स्पर्धा अन्यत्र हलवण्यात यावी का, या विषयावर एसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. २४ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
डिसेंबर महिन्यात ढाक्यात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील संघाने बांगलादेश दौरा रद्द केला होता. हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत यावेळी अफगाणिस्तान संघही सहभागी होणार आहे. मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पध्रेत ते प्रथमच सहभागी होणार आहेत.

Story img Loader