मीरपूर :फलंदाजांच्या हाराकिरीचा भारतीय महिला संघाला पुन्हा फटका बसला. रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाला ४० धावांनी पराभूत केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय महिला संघाचा हा पहिला पराभव आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यमगती गोलंदाज अमनज्योत कौरने पदार्पणात प्रभावी मारा करताना चार बळी मिळवले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव ४३ षटकांत १५२ धावांवर संपुष्टात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४४ षटकांचा करण्यात आला होता आणि डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार भारताला १५४ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, भारताचा डाव ३५.५ षटकांत ११३ धावांतच गडगडल्याने त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. मध्यमगती गोलंदाज मारूफा अक्तर (४/२९) आणि लेग-स्पिनर राबेया खान (३/३०) यांनी बांगलादेशकडून अप्रतिम गोलंदाजी केली.

भारताच्या फलंदाजांनी संपूर्ण बांगलादेश दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला केवळ ९५ धावा करता आल्या होत्या आणि त्यानंतरही त्यांना सामना जिंकण्यात यश आले होते. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने केवळ १०२ धावा केल्या होत्या आणि बांगलादेशने आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना विजय मिळवला होता. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी एकदिवसीय मालिकेतही कायम राखली आहे.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ठरावीक अंतराने गडी गमावले. अक्तरने स्मृती मनधाना (११) व प्रिया पुनिया (१०) या सलामीच्या फलंदाजांना झटपट बाद केले. मग राबेयाने यास्तिका भाटियाला (१५) फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरही (५) अपयशी ठरली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (२६ चेंडूंत १०), दीप्ती शर्मा (४० चेंडूंत २०) आणि पदार्पणवीर अमनज्योत (४० चेंडूंत १५) यांनी जवळपास १८ षटके खेळून काढली, पण त्यांना केवळ ४५ धावा करता आल्या.

त्यापूर्वी बांगलादेशचा डाव ४३ षटकांत १५२ धावांवर संपुष्टात आला होता. बांगलादेशची २ बाद १४ अशी स्थिती होती. मात्र, कर्णधार निगार सुल्ताना (६४ चेंडूंत ३९) आणि फर्गाना हक (४५ चेंडूंत २७) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनाही अमनज्योतने माघारी पाठवले. यानंतर बांगलादेशने ठरावीक अंतराने गडी गमावल्याने त्यांना मोठी मजल मारता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ४३ षटकांत सर्वबाद १५२ (निगार सुल्ताना ३९, फर्गाना हक २७; अमनज्योत कौर ४/३१, देविक वैद्य २/३६) विजयी वि. भारत : ३५.५ षटकांत सर्व बाद ११३ (दीप्ती शर्मा २०, यास्तिका भाटिया १५, अमनज्योत कौर १५; मारूफा अक्तर ४/२९, राबेया खान ३/३०)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh women defeat india women in odi for the first time zws