प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीच्या गैरहजेरीचा फटका बार्सिलोना संघाला बसला. मेस्सीच्या अनुपस्थितीत ला लिगा स्पर्धेच्या लढतीत बिलबाओने बलाढय़ बार्सिलोनावर १-० अशी मात केली.
प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाला अजॅक्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अजॅक्सच्या विजयातून प्रेरणा घेत अ‍ॅथलेटिक बिलबाओने दिमाखदार विजयाची नोंद केली. मेस्सीच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाचे आक्रमण कमकुवत होते, हे लक्षात घेऊन बिलबाओने आपली रणनीती आखली.
बार्सिलोना खेळत असल्याने भरपूर गोलची पर्वणी मिळेल हा फुटबॉल रसिकांचा अंदाज साफ चुकला. पहिल्या सत्रात बार्सिलोनाचे आक्रमण भरकटले. सातत्याने चेंडूवर नियंत्रण मिळवत गोल करण्यासाठी प्रयत्नशील मेस्सी नसल्याचा फटका बार्सिलोनाला बसला. आक्रमणावर मर्यादा असल्याने बार्सिलोनाने बचावावर भर देत बिलबाओला गोल करण्यापासून रोखले. दोन्ही संघांनी बचावात्मक तंत्र अवलंबल्याने पहिले सत्र रटाळ झाले.
मध्यंतरानंतर बिलबाओतर्फे इकर म्युनिअनने ७० व्या मिनिटाला गोल करीत बिलबाओलासाठी पहिला गोल केला. मार्केल सुसाइटच्या क्रॉसवर शिताफीने गोल करीत म्युनिअनने बिलबाओला आगेकूच करण्याची संधी दिली. बार्सिलोनाने यानंतर बचाव भक्कम करीत बिलबाओला आणखी गोल करण्याची संधी दिली नाही, मात्र त्यांनाही गोल करण्यात अपयश आले. २००६ नंतर बिलबाओने बार्सिलोनावर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. या पराभवानंतरही बार्सिलोना अव्वल स्थानी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा