स्पॅनिश फुटबॉल लीगचे विजेते बार्सिलोना फुटबॉल क्लबने आपला संघ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारला करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम मोजली. परंतु या अर्थव्यवहारासंदर्भातील करांचा ससेमिरा बार्सिलोनामागे लागला आहे. नेयमारच्या ‘बदली करा’संदर्भात बार्सिलोनावर न्यायालयाने ठपका ठेवला आहे. बार्सिलोना संघाच्या मते त्यांनी नेयमारच्या बदलीच्यावेळी स्वेच्छेने १३.५ दशलक्ष युरोंचा कर भरला आहे. नियमांनुसारच साऱ्या प्रक्रिया केल्या आहेत, त्यामध्ये घोटाळ्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण बार्सिलोनाने दिले आहे. पण याविरोधात माद्रिदच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून, त्यासाठी बार्सिलोनाला आपली बाजू मांडावी लागणार आहे.
यासंदर्भात न्यायाधीश पाबले रुझ यांनी काही गंभीर गोष्टी निदर्शनास आणून दिल्या असून, त्यांनी बार्सिलोनावर नेयमारची ब्राझिलच्या क्लबमधून बदली करताना करामध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, ‘‘नेयमारच्या बदलीसंदर्भात बार्सिलोना संघाने जनतेच्या पैशांचा अपव्यय केला असून, याबाबतचे ठोस पुरावे निदर्शनास आले आहेत.’’
नेयमारला संघात घेताना बार्सिलोना संघाने ८६ दशलक्ष युरो एवढी प्रचंड रक्कम भरली होती, त्यामुळे या रकमेवर योग्य तो कर भरण्यात आलेला नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. मे २०१३मध्ये बार्सिलोनाने नेयमारला करारबद्ध केले होते. त्यानंतर नेयमारने लिओनल मेस्सीच्या साथीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली होती.
या सर्व प्रकारावर बार्सिलोनाने सांगितले आहे की, ‘‘या प्रकारात जे काही आम्ही करू ते नियमांनुसारच असेल, नियमबाह्य़ काम आमच्याकडून घडणार नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा