सुआरेझची दमदार हॅट्ट्रिक; लिओन मेस्सीकडून संघभावनेचा वस्तुपाठ; सेल्टा डी व्हिगोवर ६-१ असा दणदणीत विजय

कॅम्प नाऊ, या आपल्या घरच्या मैदानावर जवळपास ७२,५८० प्रेक्षकांसमोर बार्सिलोनाने सेल्टा डी व्हिगो क्लबचा ६-१ असा दणदणीत पराभव करून ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदावरील पकड अधिक मजबूत केली. लुईस सुआरेझची हॅट्ट्रिक आणि लिओनेल मेस्सी, रॅकिटिक व नेयमार यांच्या प्रत्येकी एक गोलमुळे बार्सिलोनाने विजय साकारला. मात्र, या विजयापेक्षा मेस्सीच्या संघभावनेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ला लिगा स्पध्रेत गोलचे त्रिशतक पूर्ण करण्याची चालून आलेली संधी मेस्सीने सुआरेझला दिली आणि त्यामुळे तो हॅट्ट्रिक पूर्ण करू शकला. या विजयासह बार्सिलोनाने तीन गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थान कायम राखले.
कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लीग सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या सुआरेझ, मेस्सी आणि नेयमार या त्रिकुटाने रविवारी मध्यरात्री ला लिगा स्पध्रेत दमदार खेळ केला. मूत्रपिंडाच्या विकारावरील उपचारानंतर मैदानात उतरलेल्या मेस्सीने २८व्या मिनिटाला फ्री किकवर गोल करून क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४०व्या मिनिटाला सेल्टाला सामन्यात बरोबरी करण्याची संधी मिळाली. जॉन गाइडेट्टीने पेनल्टीवर गोल करून पहिल्या सत्रात सामना १-१ असा बरोबरीत आणला.
दुसऱ्या सत्रातील पहिली पंधरा मिनिटे कंटाळवाणा वाटणाऱ्या खेळात सुआरेझच्या गोलने जिवंतपणा ओतला. ५९व्या मिनिटाला सुआरेझ व मेस्सीच्या जुगलबंदीने सेल्टाच्या बचावपटूंना चकवले आणि सुआरेझने ‘हाफव्हॉली’द्वारे गोल करून बार्सिलोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ७५व्या मिनिटाला सुआरेझने आणखी एक गोल केला.
८१व्या मिनिटाला बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली. पेनल्टीवर गोल करण्यासाठी मेस्सी पुढे सरसावला. ला लिगा स्पध्रेतील त्याचा तीनशेवा गोल नजरकैद करण्यासाठी स्टेडियम स्तब्ध झाले, परंतु वैयक्तिक विक्रमापेक्षा सांघिक कामगिरीला अधिक महत्त्व देणाऱ्या मेस्सीने चेंडू गोलजाळीच्या दिशेने न भिरकावता उजव्या बाजूला उभ्या असलेल्या सुआरेझकडे सोपवला. तोपर्यंत सेल्टाचा गोलरक्षक अ‍ॅलव्हारेझ चेंडू अडवण्यासाठी पुढे सरकला होता. मेस्सीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत सुआरेझने हॅट्ट्रिक पूर्ण करून क्लबची आघाडी ४-१ अशी भक्कम केली. त्यनंतर इव्हान रॅकिटिक (८४ मि.) आणि नेयमार (९० मि.) यांनी भर टाकून बार्सिलोनाचा ६-१ असा विजय निश्चित केला.
१०
सुआरेझने कॅम्प नाऊ स्टेडियमवर मागील पाच सामन्यांत दहा गोल केले आहेत.
०१
बार्सिलोनाविरुद्ध ला लिगा स्पध्रेत मार्च २०१५नंतर पेनल्टीवर गोल करणारा जॉन गाइडेट्टी हा पहिला खेळाडू आहे.
२३
ला लिगा स्पध्रेच्या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक २३ गोल सुआरेझच्या नावावर आहेत. रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (२१) आणि करिम बेंझेमा (१९) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. मेस्सी १३ गोलसह सातव्या स्थानावर आहे.
०२
बार्सिलोनाला घरच्या मैदानावर सेल्टाविरुद्ध ४९ सामन्यांत केवळ दोन वेळाच पराभव पत्करावा लागला. नोव्हेंबर २०१४मध्ये सेल्टाने (१-०) बार्सिलोनावर कॅम्प नाऊ येथे अखेरचा विजय मिळवला होता.
१६
लुईस एन्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने ला लीगा स्पध्रेत सलग १६ सामन्यांत (१२ विजय व ३ अनिर्णीत) अपराजीत राहण्याचा विक्रम केला.

Story img Loader