बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यात अव्वल स्थान कोण पटकावणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण बार्सिलोनाचे आघाडी मिळवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांनी स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी ५० गुणांची कमाई केली आहे. फक्त गोलफरकाच्या आधारावर बार्सिलोना संघ अव्वल स्थानी आहे.
दुखापती आणि आजारपणामुळे लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांना बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी राखीव खेळाडूंमध्ये बसवले होते, पण पहिल्या सत्रात गोल करण्याच्या संधी वाया घालवल्यानंतर तसेच दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच आंद्रेस इनियेस्टा जायबंदी झाल्यामुळे मेस्सीला संधी देण्यात आली. मार्टिनो यांचा हा निर्णय मेस्सी सार्थ ठरवणार, अशी शक्यता निर्माण झाली होती, पण सामना संपायला नऊ मिनिटे असताना मेस्सीने केलेला गोल करण्याचा प्रयत्न अॅटलेटिकोचा गोलरक्षक थिबॉट कोर्टियस याने हाणून पाडला. त्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिदपेक्षा रिअल माद्रिद संघ सहा गुणांनी मागे असला तरी गुणांची ही पिछाडी भरून काढण्याची संधी रिअल माद्रिदला आहे. ‘‘घरच्या मैदानावर एकही सामना न गमावलेल्या बलाढय़ अॅटलेटिको माद्रिदविरुद्ध आम्ही विजयासाठी कडवा संघर्ष केला. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नसला तरी सामन्याच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत,’’ असे मार्टिनो म्हणाले. अॅटलेटिकोचे प्रशिक्षक दिएगो सिमोन यांना मात्र विजेतेपदाचे वेध लागले आहेत. ‘‘दोन्ही संघांनी आपापल्या ताकदीप्रमाणे खेळ करत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, मात्र खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळेच आम्हाला ५० टक्के गुणांची कमाई करता आली. यापुढे चांगली कामगिरी करून जेतेपदावर मोहोर उमटवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे सिमोन यांनी सांगितले.
दरम्यान, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या अॅटलेटिको बिलबाओ संघाने अल्मेरियाचा ६-१ असा धुव्वा उडवला. सहाव्या मिनिटाला मिकेल रिकोने बिलबाओचे खाते खोलल्यानंतर १०व्या मिनिटाला आंदर हेरेराने दुसऱ्या गोलाची भर घातली. दुसऱ्या सत्रात आयमेरिक लापोर्टेने गोल केल्यानंतर हेल्डर बाबरेसाने चौथा गोल लगावला. त्यानंतर ईबाई गोमेझने दोन गोल लगावत बिलबाओच्या विजयावर मोहोर उमटवली.
बार्सिलोनाचे प्रयत्न व्यर्थ
बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यात अव्वल स्थान कोण पटकावणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण बार्सिलोनाचे आघाडी मिळवण्याचे
First published on: 13-01-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona atletico madrid content with draw real madrid lurking