प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावा घेतल्याप्रकरणी बंदीची शिक्षा पूर्ण करून पुनरागमन करणाऱ्या लुइस सुआरेझचे घरच्या मैदानावरील पदार्पण बार्सिलोनासाठी फलदायी ठरले नाही. ला लिगा स्पर्धेत सेल्टा डी विगो संघाने बार्सिलोनावर १-० असा सनसनाटी विजय मिळवला. सेल्टातर्फे जोअ‍ॅक्विन लॅरिव्हने एकमेव गोल केला. सुआरेझसह नेयमार तसेच लिओनेल मेस्सीने गोलसाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र सेल्टाचा गोलरक्षक सर्जिओ अल्वारेझ अभेद्य बचावामुळे या प्रयत्नांचे गोलमध्ये रुपांतर होऊ शकले नाही. बार्सिलोनाच्या या पराभवाचा फायदा रिअल माद्रिदला झाला असून, त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. रिअल माद्रिदने ग्रॅनडाचा ४-० धुव्वा उडवला. अ‍ॅटलेटिको माद्रिदने कोरडोबाला ४-२ असे नमवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
बॅडमिंटन : कौशल धर्मामेर अजिंक्य
मुंबई : गांधीधाम, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईकर कौशल धर्मामेरने अनुभवी चेतन आनंदवर मात करत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. कौशलने ही लढत २१-१९, १७-२१, २१-१४ अशी जिंकली. महिलांमध्ये जी.रुथविका शिवानीने रितुपर्णा दासवर २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत मुंबईच्या श्लोक रामचंद्रनने सन्यम शुक्लाच्या साथीने खेळताना अल्विन फ्रान्सिस-अरुण विष्णूवर जोडीवर २२-२०, २१-८ अशी मात केली. महिला दुहेरीत मेघना.जे-मनीषा.के जोडीने धन्या नायर आणि मोहिता सचदेव जोडीला नमवले. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू-अपर्णा बालन जोडीने हेमगेंद्र बाबू.टी-पूर्विशा राम जोडीचा २१-१९, १७-२१, २१-१४ असा पराभव केला.
टेटे : अक्षय सागाणेचा संघर्षपूर्ण विजय
मुंबई : पी.जे.हिंदू जिमखाना आयोजित मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय सागाणेने यश बजलावर ८-११, १०-१२, ११-५, ११-७, ११-९ असा विजय मिळवला. तन्मय राणेने राज शेटय़ेवर १२-१०, ११-४, ११-४ अशी मात केली. आदित्य शिंदेने समीहान कुलकर्णीला ११-५, १०-१२, ११-५, ११-६ असे नमवले. मुलींच्या सबज्युनियर गटात मानसी चिपळूणकरने शानिका कदमचा ११-४, ११-३, ११-४, ११-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. केनिशा खातवानीने कृष्णा अगरवालवर ११-८, ११-७, ८-११, ११-५, १४-१२ अशी मात केली.  
क्रिकेट : दुलीप करंडक मध्य विभागाकडे
नवी दिल्ली : कर्णधार पीयूष चावलासह मध्य विभागाच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत दक्षिण विभागाला केवळ नऊ धावांनी हरवले आणि दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. विजयासाठी ३०१ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना शेवटच्या दिवशी दक्षिण विभागाला ११७ धावांची आवश्यकता होती व त्यांचे नऊ फलंदाज बाकी होते. मात्र फिरकीला अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर ३ बाद २५२ धावसंख्येवरून त्यांचा दुसरा डाव ८८.४ षटकांत २९१ धावांमध्ये आटोपला. मध्य विभागाकडून चावला (३/८३), अली मुर्तूझा (३/५९), जलज सक्सेना (२/४४) व पंकज सिंग (२/४५) यांनी अचूक गोलंदाजी करीत संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला.
क्रिकेट : ग्लोब ग्रुपचा थरारक विजय
मुंबई : शेवटच्या चेंडूवर चिंतन शहाने मारलेल्या चौकाराच्या जोरावर ग्लोब ग्रुपने अत्यंत थरारक लढतीत युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा दोन विकेटने पराभव करीत कॅपिटल ट्वेन्टी-२० कॉपरेरेट क्रिकेट लीग इ-विभागामध्ये दणदणीत सलामी दिली. अन्य सामन्यात बेस्ट, इंडसइंड बँक यांनी विजयाचा श्रीगणेशा केली. एफ-विभागामध्ये डॉइश बँक,टेक महिंद्र आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीने धडाकेबाज सुरूवात केली. ग्लोब ग्रुपच्या चिंतन शहाने १९ धावांत ३ बळी घेताना युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा डाव १२२ धावांत संपवला. यात सचिन जगतापच्या ७१ धावांचा मोलाचा वाटा होता. या धावांचा पाठलाग करताना ग्लोब ८ बाद ११७ अशी दुर्दशा झाली होती, पण चिंतन शहाने सावध खेळ करून संघाला विजय मिळवून दिला.
खो-खो : विहंग-महात्मा गांधी अकादमी अंतिम फेरीत
मुंबई : अमर िहद मंडळाने मुंबई खो-खो संघटना व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या विभागीय खो-खो स्पध्रेच्या जेतेपदासाठी पुरुषांमध्ये विहंग क्रीडा मंडळ व महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी यांच्यात, तर महिलांमध्ये रा. फ. नाईक विद्यालय व शिवभक्त क्रीडा मंडळ यांच्यात सामना रंगणार आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विहंगने प्रबोधन क्रीडा भवनचा १३-१२ असा चुरशीच्या डावात एका गुणाने पराभव केला. विहंगच्या सचिन पालकर, महेश िशदे व रंजन शेट्टी यांनी चमकदार कामगिरी केली, तर प्रबोधनच्या सागर घाग, अक्षय मिरगळ व किरण कांबळे यांनी जिद्दीने खेळ केला. तसेच दीपक माधव, हर्षद हातनकर व सौरभ चव्हाण यांच्या खेळाच्या जोरावर महात्मा गांधीने श्री सह्य़ाद्रीचा १८-१२ असा पराभव केला. महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रा. फ. नाईक विद्यालयाने परांजपे स्पो. क्लबवर ८-७ असा तब्बल साडेसहा मिनिटे राखून विजय मिळवला. राफच्या पौणिमा सकपाळ, पूजा डांगे व प्रणाली मगर यांचा खेळ चांगला झाला. तसेच शिवभक्त क्रीडा मंडळाने महात्मा गांधी अकादमीवर ७-६ असा विजय मिळवला. शिवभक्तच्या प्रियंका भोपी, कविता घाणेकर व पूजा भोपी यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा