गोल करण्याच्या कौशल्यात अद्भुत सातत्य जपणाऱ्या लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपला दबदबा प्रस्थापित केला. ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवत मेस्सीने बार्सिलोनाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ‘एल क्लासिको’ नावाने प्रसिद्ध या मुकाबल्यात रिअल माद्रिदने दमदार आगेकूच केली होती. मात्र मेस्सीच्या अफलातून खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने पिछाडी भरून काढत विजय साकारला.
बार्सिलोनातर्फे आंद्रेस इनेस्टाने मेस्सीच्या पासचा उपयोग करत खाते उघडले. रिअल माद्रिदच्या करिम बेन्झामाने २०व्या आणि २४व्या मिनिटाला गोल करत रिअलला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला तीन मिनिटे असताना मेस्सीने आपल्या अस्तित्वाची पहिली झलक देत गोल केला. मध्यंतराला २-२ अशी बरोबरीची स्थिती होती. दोन्ही संघांना एकमेकांचे आक्रमण रोखण्यात अपयश आले. विश्रांतीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत रिअल माद्रिदला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर बार्सिलोनाच्या नेयमारला धक्का दिल्यामुळे रिअल माद्रिदच्या सर्जिओ रामोसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या रिअल माद्रिदला मेस्सीने दणका दिला. ६५व्या मिनिटाला गोल करत मेस्सीने बरोबरी करून दिली. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना मेस्सीने झेबी अलोन्सोच्या पासचा उपयोग करत सुरेख गोल केला आणि बार्सिलोनाला निसटता विजय मिळवून दिला.
३२ लढतींनंतर रिअल माद्रिदला पराभवाला सामोरे जावे लागल्याने गुणतालिकेत अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि रिअल संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत तर बार्सिलोनाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा