सुआरेझचे चार, तर मेस्सीचे तीन गोल; व्हॅलेन्सिआवर ७-० असा दणदणीत विजय
लुईस सुआरेझ (४) आणि लिओनेल मेस्सी (३) यांच्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत बार्सिलोनाने ७-० अशा फरकाने व्हॅलेन्सिआवर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे प्रशिक्षक गॅरी नेव्हिल यांच्या हकालपट्टीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या कार्यशैलीवर टीका केली.
लुईस एन्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बार्सिलोनाने सातत्यपूर्ण कामगिरीचा सपाटा कायम राखला. सुआरेझने १२ मिनिटांत दोन गोल करून बार्सिलोनाला दमदार सुरुवात करून दिली. त्यात मेस्सीने २९व्या मिनिटात भर घातली, परंतु नेयमारला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्याने मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाला ३-० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. पेनल्टी क्षेत्राच्या आतमध्ये उभ्या असलेल्या मेस्सीला पाडल्यामुळे व्हॅलेन्सिआच्या श्कोड्रन मुस्ताफीला लाल कार्ड दाखवण्यात आले.
दुसऱ्या सत्रात व्हॅलेन्सिआला दहा खेळाडूंसह विजयाची धडपड कायम राखावी लागली. मेस्सीने ५८ व ७४व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. सामन्याच्या अखेरच्या दहा मिनिटांत सुआरेझने आणखी दोन गोल केले. हतबल व्हॅलेन्सिआवर ७-० असा दणदणीत विजय मिळवून बार्सिलोनाने अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले.
सत्रातील हा सर्वोत्तम सामना होता. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अखेपर्यंत आम्ही विजयी आविर्भावात खेळलो.
– लुईस सुआरेझ
जेतेपदाच्या दिशेने बार्सिलोनाची कूच
दुसऱ्या सत्रात व्हॅलेन्सिआला दहा खेळाडूंसह विजयाची धडपड कायम राखावी लागली.

First published on: 05-02-2016 at 03:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona beat valencia by 7