लिओनेल मेस्सीने केलेल्या निर्णायक गोलमुळे बार्सिलोनाने व्हिलारिअलची कडवी झुंज ३-२ अशी मोडीत काढली. या विजयासह बार्सिलोनाने ८४ गुणांसह दुसरे स्थान पटकावत स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. स्पर्धेचे तीन सामने शिल्लक राहिले असून अ‍ॅटलेटिको माद्रिद ८८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हॅलेन्सियावर १-० असा विजय मिळवून १८ वर्षांनंतर जेतेपद पटकावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
काही दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झालेले माजी प्रशिक्षक टिटो व्हिलानोव्हा यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर बार्सिलोना या सामन्याला सुरुवात केली. मात्र रुबेन कानीने ४५व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे व्हिलारिअलने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मॅन्युएल ट्रिगेरस याने आणखी एका गोलाची भर घालत व्हिलारिअलची आघाडी २-० अशी वाढवली. पण दोन गोल्सनी पिछाडीवर पडलेल्या बार्सिलोनाने सुरेख पुनरागमन करून दुसऱ्या सत्रात तीन गोल लगावत तीन गुणांची कमाई केली. गॅब्रियल पॉलिस्टा (६५व्या मिनिटाला) आणि मटेओ मुसाचिओ (७८व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे बार्सिलोनाने सामन्यात बरोबरी साधली. बार्सिलोनासाठी निर्णायक गोल करण्याचे दानी अल्वेस आणि झावी यांचे प्रयत्न थोडक्यात हुकले. पण चेंडूवर ताबा मिळवत गोलक्षेत्रात धावत येऊन मेस्सीने मारलेला धीम्या गतीचा फटका व्हिलारिअलचा गोलरक्षक सर्जिओ अस्नेजो याला चकवून गोलजाळ्यात विसावला. याच गोलाच्या आधारावर बार्सिलोनाने विजय साजरा केला.

Story img Loader