दमदार आणि सातत्यपूर्ण खेळासाठी स्पेनमधील बार्सिलोनाचा संघ ओळखला जातो. विविध स्पर्धाची जेतेपदे खुणावत असलेले बार्सिलोना व्यवस्थापन जगभरातील अव्वल खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी उत्सुक असते. या सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या ब्राझिलच्या नेयमारला गेल्या वर्षी त्यांनी करारबद्ध करत संघ मजबूत केला आहे. मात्र नेयमारला खरेदी करण्याच्या उत्साहात बार्सिलोनाने करविषयक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत सध्या अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोनाने ८६ दशलक्ष युरो एवढी प्रचंड रक्कम मोजत नेयमारला ताफ्यात दाखल करून घेतले, मात्र या व्यवहारात बार्सिलोनाने गैरव्यवहार केल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. परंतु हा आरोप बार्सिलोनाने फेटाळून लावला आहे.
नेयमारच्या व्यवहारासाठी बार्सिलोना क्लबने करविभागाला ९ दशलक्ष युरो रक्कम देणे आवश्यक होते. मात्र बार्सिलोनाने ही रक्कम भरलेली नाही, तसेच व्यवहारादरम्यान अनेक संशयास्पद करार झाल्याचेही न्यायालयाचे म्हणणे आहे.
पुरेसे पुरावे पाहिल्यानंतरच न्यायाधीश पाब्लो रुझ यांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी बार्सिलोनावर खटला दाखल करण्याची मागणी केली. क्लबच्या कर परताव्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी करविषयक अधिकाऱ्यांना केली आहे. नेयमारची स्पेनमधील कर भरणारा व्यक्ती म्हणून नोंद आहे का ब्राझिलचा स्थानिक म्हणून याविषयीचे स्पष्टीकरणही मागवण्यात आले आहे.
नेयमारच्या व्यवहाराचा तपशील आणि नक्की किती रक्कमेचा अपहार झाला याविषयी माहिती देण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. व्यवहाराशी संबंधित कंपन्या आणि त्यांची कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायाधीशांनी नेयमारचे वडील नेयमार डा सिल्व्हा सँटोस यांना दिला आहे. फुटबॉल नियंत्रित करणारी सर्वोत्तम संघटना अर्थात फिफालाही नेयमारच्या व्यवहाराची माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
बार्सिलोना संघव्यवस्थापनाने मात्र सर्व व्यवहार नियमांनुसारच झाल्याचे स्पष्ट केले. क्लबचे नवे अध्यक्ष जोसेप मारिया बाटरेमेयू यांनीही क्लबने पैशाची अफरातफर केला नसल्याचा दावा केला.
दरम्यान, याप्रकरणी ब्राझिलमध्ये करविषयक खात्याने संभाव्य घोटाळ्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे आपल्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असून, माहिती किंवा ठोस पुरावे नसताना कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवणे योग्य नसल्याचे नेयमारने म्हटले आहे.

Story img Loader