काही दिवसांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने पॅरिस सेंट जर्मेन संघाला कोणतीही संधी न देता शानदार विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानावर या दोन संघांमध्ये मुकाबला होणार आहे. शेवटच्या लढतीतील विजयाने हुरळून न जाण्याचे आवाहन बार्सिलोनाचा बचावपटू डॅनी अल्वेसने केले आहे. सेंट जर्मेनविरुद्धच्या लढतीत बार्सिलोनाने ल्युइस सुआरेझच्या दोन गोलच्या बळावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. सुआरेझने हा चांगला फॉर्म कायम राखावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. विक्रमी चारशेवा गोल करणारा लिओनेल मेस्सी बार्सिलोनाचा आधारस्तंभ आहे. युवा नेयमारला सूर गवसल्यास बार्सिलोनाला दणदणीत विजय मिळवता येऊ शकतो.
ला लिगा, कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीग अशा तीन स्पर्धाची जेतेपदे मिळवण्याची बार्सिलोनाला संधी आहे. ल्युइस एन्रिकच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाला डॅनी अल्वेसच्या पुनरागमनामुळे बळकटी मिळाली आहे. आंद्रेस इनेयस्टा पाठीच्या दुखण्यातून सावरत खेळण्याची शक्यता आहे.

Story img Loader