३४ सामन्यांत अपराजित; सेव्हिल्लावर विजय
ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील सोमवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने ०-१ अशा पिछाडीवरून सेव्हिल्ला क्लबचा २-१ असा पराभव केला. या विजयाबरोबर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पध्रेत सलग ३४ सामने अपराजित राहण्याच्या रिअल माद्रिदच्या विक्रमाशी बरोबरी केली. माद्रिदने १९८८-९८च्या हंगामात ३४ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला होता. बार्सिलोनाने ६६ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सेव्हिल्लाने २-१ अशा फरकाने बार्सिलोनावर विजय मिळवला होता. त्या पराभवानंतर बार्सिलोनाने सातत्यपूर्ण खेळ करून ३४ सामन्यांत अपराजित राहण्याचा किमया केली. गेल्या वर्षीच्या पराभवाची पुनरावृत्ती करून सेव्हिल्ला बार्सिलोनाचा विजयरथ अडवेल असे चिन्ह दिसत होते. २०व्या मिनिटाला व्हिटोलोने गोल करून सेव्हिल्लाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ३१व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत १-१ अशा बरोबरीत असलेल्या सामन्यात ४८व्या मिनिटाला गेरार्ड पिक्यूने रंजकता आणली. त्याच्या गोलच्या जोरावर बार्सिलोनाने २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी अखेपर्यंत कायम राखत बार्सिलोनाने २-१ असा विजय निश्चित केला.

Story img Loader