लिओनेल मेस्सीच्या एकमेव गोलच्या जोरावर स्पॅनिश लीग स्पर्धेतील बार्सिलोनाने व्हॅलेन्सिआविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. स्पॅनिश लीग स्पर्धेतला मेस्सीचा हा १२वा गोल. व्हॅलेन्सिआतर्फे मिडफिल्डर इव्हर बनेगाने ३३व्या मिनिटाला गोल केला. मात्र त्यानंतर सहा मिनिटांनंतर लगेचच मेस्सीने पेनल्टी कॉर्नरच्या आधारे गोल करत बार्सिलोनाला बरोबरी करून दिली. डेव्हिड व्हिलाला गोल करण्याची चांगली संधी होती, मात्र व्हॅलेन्सिआच्या गोलकीपरला भेदण्यात त्याला अपयश आले. यानंतरही रॉबटरे सोलडाडोचा गोल व्हॅलेन्सिआच्या व्हिक्टर वेलडासने रोखल्यामुळे बार्सिलोनाला बरोबरीत समाधान मानावे लागले.
बार्सिलोनासाठी गेल्या पाच दिवसांमधली ही दुसरी लढत बरोबरीत सुटली. याआधीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदविरुद्ध त्यांना १-१ बरोबरीत समाधान मानावे लागले होते. मात्र दोन लढती बरोबरीत संपूनही बार्सिलोनाच्या नावावर १९ विजय आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी केवळ एक लढत गमावली आहे, यामुळे गुणतालिकेत रिअल माद्रिदपेक्षा ते १६ गुणांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान अ‍ॅटलेटिको माद्रिदने रिअल बेटिसला १-०ने नमवत दमदार आगेकूच केली. या विजयासह अ‍ॅटेलेटिकोने गुणतालिकेतील बार्सिलोनाची मोठी आघाडी कमी केली आहे. मोठय़ा दुखापतीनंतर राडामेल फालको अ‍ॅटलेटिकोसाठी परतला. दिएगो कॉस्टाने ५६व्या मिनिटाला गोल करत अ‍ॅटलेटिकोला विजय मिळवून दिला. रविवारी झालेल्या लढतींमध्ये मलागा आणि रिअल झारागोझा यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. नवीन प्रशिक्षक इनाई इमरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सेव्हिलाने रायो व्हॅलकानोचा २-१ने पराभव केला. रिअल सोसीदादने मार्लोकाचा ३-०ने धुव्वा उडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona equal to valencia with messi goal