नेयमारने केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत बायर्न म्युनिकने ३-२ असा विजय मिळवला मात्र गोल सरासरीत ५-३ अशा आघाडीच्या जोरावर बार्सिलोनाचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला. स्पर्धेतली सलग चार सामन्यांत पराभवाची मालिका बायर्नने या विजयासह खंडित केली. बार्सिलोनाने २०११ नंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे.
गेल्या आठवडय़ात या दोन संघांदरम्यान झालेल्या लढतीत बायर्न म्युनिकचा ०-३ असा धुव्वा उडाला होता. या पराभवाचा गोल सरासरीवर परिणाम होणार असल्याने बायर्नचे अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न मावळले. मात्र उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत जिद्दीने खेळ करत बायर्न म्युनिकने शानदार विजय साकारला. सातव्या मिनिटालाच मेढी बेनाटिआने गोल करत बायर्नचे खाते उघडले. मात्र काही मिनिटांतच नेयमारने ल्युईस सुआरेझने दिलेल्या पासवर गोल करून बार्सिलोनाला बरोबरी करून दिली. २९व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल करण्याची क्षमता सिद्ध करत नेयमारने सुआरेझकडून मिळालेल्या पासवर गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरापर्यंत नेयमारचे आक्रमण थोपवण्यात बायर्नला अपयश आले. त्याच वेळी बार्सिलोनाचा बचाव भेदण्यात कमी पडल्याने त्यांना बरोबरी करता आली नाही. मात्र विश्रांतीनंतर ठोस रणनीतीसह खेळणाऱ्या बायर्नने बार्सिलोनाच्या बचावफळीवर सातत्याने दडपण ठेवले. रॉबर्ट लेवानडोव्हस्कीने ५९व्या मिनिटाला सुरेख गोल करत बायर्नला बरोबरी करून दिली. अनुभवी थॉमस म्युलरने ७४व्या मिनिटाला गोल करत बायर्नला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात दोन गोल करणाऱ्या नेयमारला मध्यंतरानंतर बायर्नच्या बचावपटूंनी रोखले. म्युलरच्या गोलनंतर उर्वरित वेळेत चेंडूवर नियंत्रण मिळवत बायर्नने ही लढत जिंकली. मात्र गोल सरासरीवर बार्सिलोना पुढे असल्याने त्यांनी अंतिम फेरीत आगेकूच केली.
या विजयासह बायर्नने बासिलरेनाची स्पर्धेतला सलग दहा विजयांचा विक्रम पूर्ण होऊ दिला नाही. ६ मे रोजी होणाऱ्या अंतिम मुकाबल्यात बार्सिलोनाचा मुकाबला रिअल माद्रिद आणि ज्युवेन्ट्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा