लिओनेल मेस्सी आणि नेयमार या दोन अव्वल खेळाडूंच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल लीगमध्ये इल्चे संघावर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. अन्य एका अटीतटीच्या लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या रीअल माद्रिद संघाने कोडरेबा संघावर २-१ असा विजय मिळवला.
ला लीगा स्पर्धेतील दोनशेवा सामना खेळणाऱ्या गेरार्ड पीक्यूने ३५ व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाची बोहनी करून दिली. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात नेयमारने तीन मिनिटांमध्ये दोन गोल करत एकच धमाका उडवला. नेयमारने ६९ आणि ७१ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर ८८ व्या मिनिटाला मेस्सीने वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर प्रेडोने संघासाठी सहावा गोल केला.
दुसऱ्या सामन्यात रीअल माद्रिदसारख्या नावाजलेल्या संघांना कोड्रोबा संघाने चांगलेच झुंजवले, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. कोडरेबा संघाच्या एन. घिलासने तिसऱ्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली; पण रीअल माद्रिदच्या करिम बेन्झेमाने २७ मिनिटाला गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. मध्यंतरानंतर रीअल माद्रिदने जोरदार हल्ले चढवले, पण त्यांना यश काही मिळत नव्हते. हा सामना अनिर्णीत राहणार, असे वाटत असतानाच गॅरेथ बेलेने ८९ व्या मिनिटाला गोल करत संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला.

Story img Loader