पहिल्या टप्प्यातील पराभवाच्या नामुष्कीनंतर लिओनेल मेस्सीच्या सुरेख कामगिरीमुळे बार्सिलोनाने एसी मिलानचा दुसऱ्या टप्प्यात ४-२ असा धुव्वा उडवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गालाटासारे या संघाने शाल्केचा पराभव करून आगेकूच केली आहे.
पहिल्या टप्प्यात ०-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर लिओनेल मेस्सीने या सामन्याच्या पहिल्या सत्रातच दोन गोल करून बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर डेव्हिड व्हिलाने दुसऱ्या सत्रात सुरेख गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना जॉर्डी अल्बा याने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला. तुर्कीच्या गाटालासारेने शाल्केचा ३-२ असा पराभव करून ४-३ अशा फरकाने २००१ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत मजल मारण्याची किमया केली.
दोन गोलांची पिछाडी या मोसमात आतापर्यंत कोणत्याही संघाला भरून काढता आली नव्हती, पण बार्सिलोनाने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावत ४-२ अशा फरकाने विजय मिळवून विजयी घोडदौड कायम राखली. पाचव्या मिनिटालाच एसी मिलानच्या पाच बचावपटूंचे जाळे भेदत मेस्सीने बार्सिलोनाचे खाते खोलले. पहिल्या सत्राच्या अखेरीस मेस्सीने एसी मिलानचा बचावपटू फिलिपे मेक्सेच्या पायांमधून चेंडू ढकलत दुसरा गोल केला आणि चॅम्पियन्स लीगमधील आपल्या ५८व्या गोलाची नोंद केली. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्याच्या १० मिनिटांनंतर व्हिलाने बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण ही आघाडी टिकविताना बार्सिलोनाला नाकी नऊ येत होते. अखेर जॉर्डी अल्बाच्या गोलमुळे बार्सिलोनाने विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ मोसमात बार्सिलोनाने एसी मिलानला तिसऱ्यांदा बादफेरीत पराभूत करण्याची करामत केली आहे.