नेयमार, मेस्सी, सुआरेझचे गोल; आर्सेनलवर विजय
नेयमार, लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझ यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने आर्सेनलवर विजय मिळवला. दुसऱ्या लीग सामन्यातील या विजयाबरोबर बार्सिलोनाने ५-१ अशा फरकाने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले.
१८व्या मिनिटाला नेयमारने बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ५१व्या मिनिटाला मोहम्मद एल्नेनीने आर्सेनलला १-१ अशी बरोबरी मिळवून देत सामन्यातील चुरस वाढवली. बार्सिलोनाच्या आक्रमणासमोर आर्सेनलचा बचाव निष्क्रिय वाटत होता. सुआरेझने ६५व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला पुन्हा आघाडीवर आणले, तर ८८व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून बार्सिलोनाचा ३-१ असा विजय निश्चित केला.
दरम्यान, निर्धारित वेळेत सामना २-२ अशा बरोबरीत सुटल्यानंतर थिएगो अ‍ॅल्कँटरा (१०८ मि.) आणि किंग्सले कोमान (११० मि.) यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिचने ४-२ अशा फरकाने युव्हेंटस्चे आव्हान संपुष्टात आणले. या विजयाबरोबर म्युनिचने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पॉल पोग्बा (५ मि.) आणि जुआन कौड्राडो (२८ मि.) यांनी युव्हेंटस्ला आघाडी मिळवून दिली, परंतु म्युनिचच्या रॉबर्ट लेवांदोवस्की (७३ मि.) आणि थॉमस म्युलर (९० मि.) यांनी सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात म्युनिचने बाजी मारली.

११ : नेयमार, मेस्सी आणि सुआरेझ या त्रिकुटाने एकाच सामन्यात गोल करण्याची ही अकरावी वेळ आहे.
०९ : बार्सिलोनाने सलग नऊ वेळा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Story img Loader