यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या बार्सिलोनाला कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. घरच्या मैदानावर बार्सिलोनाचा मुकाबला व्हिलारिअलशी होत असून, अंतर्गत बंडाळ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी बार्सिलोना सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच रिअल सोसिदादने बार्सिलोनावर १-० असा खळबळजनक विजय मिळवला होता.
खेळाडूंच्या खरेदी-विक्री प्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्सिलोनावर कायदेशीर कारवाई करण्यात आली तसेच नेयमारच्या खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचेही उघड झाले होते. मात्र मैदानाबाहेर घडणाऱ्या घटनांनी व्यथित होऊ न देता बार्सिलोनाने सलग दहा विजयांची नोंद केली. मात्र सोसिदादने त्यांचा विजयरथ रोखला.
नेयमार, लिओनेल मेस्सी आणि ल्युइस सुआरेझ यांनी बार्सिलोनाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. कर्णधार झेव्ही फर्नाडिझचे पुनरागमन बार्सिलोनासाठी उत्साहवर्धक आहे. दुसरीकडे व्हिलारिअलला बार्सिलोनाविरुद्धच्या आधीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Story img Loader