लुईस सुआरेझ व लिओनेल मेस्सी यांच्या बहारदार कामगिरीमुळे बार्सिलोना संघाने रविवारी स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये ग्रेनाडाविरुद्ध ३-१ असा विजय मिळविला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोनाने आक्रमक खेळावर भर दिला़  २५ व्या मिनिटाला इव्हान रॅकिटिकने बार्सिलोनासाठी खाते उघडल़े  चेंडूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून गोल करण्याच्या तयारीत असलेल्या सुआरेझचा चेंडू गोलपोस्टवर आदळून परत आला़  मात्र, इव्हान याने तो चपळाईने गोलपोस्टमध्ये तटविला़  
त्यानंतर ४८व्या मिनिटाला त्याने दिलेल्या पासवर सुआरेझने संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. सुआरेझ याचा या आठवडय़ातील तिसरा गोल आहे. ग्रेनाडा संघास ५३ व्या मिनिटाला पेनल्टी किकची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत फ्रॅन रिको याने गोल केला व सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र ७०व्या मिनिटाला पुन्हा इव्हानने जोरदार चाल करीत मेस्सीला सुरेख पास दिला. मेस्सीने अचूक फटका मारून संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवीत बार्सिलोना संघाने सामना जिंकला.
सुआरेझ व मेस्सी यांच्या झंझावातासमोर अलबर्ट ब्युएनो याची कामगिरी झाकोळली गेली. ब्युएनोच्या कामगिरीमुळेच रेयो व्हॅलीकानो संघास लेव्हान्टे संघाविरुद्ध ०-१ अशा पिछाडीवरून ४-२ असा विजय मिळविता आला. व्हिक्टर कॅसेडीस याने लेव्हान्टे संघास सुरुवातीला आघाडी मिळवून दिली.
मात्र त्याचा आनंद फार वेळ टिकला नाही. ब्युएनो याने २३व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर त्याने पंधरा मिनिटांत आणखी तीन गोल करीत संघास सनसनाटी यश मिळवून दिले. कालु उचे याने लेव्हान्टे संघाचा दुसरा गोल नोंदविला, मात्र तोपर्यंत व्हॅलीकानो संघाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले होते.

Story img Loader