बार्सिलोना आणि रिअल माद्रिद संघांनी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत सहज विजय मिळवत आगेकूच केली. लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाने गेटाफेवर २-० अशी मात केली तर रिअल माद्रिदने लास पाल्मसला ३-१ असे नमवले.

स्नायूंच्या दुखापतीमुळे मेस्सी जवळपास महिनाभर बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करू शकलेला नाही. मेस्सीच्या अनुपस्थितीत नेयमार आणि लुइस सुआरेझ यांनी एकत्र खेळताना १४ गोल केले आहेत. सर्जी रॉबटरेने अफलातून खेळासह सुआरेझला पास दिला. सुआरेझने या पासचा उपयोग करून घेत गोल केला. मध्यंतरानंतर रॉबटरेने नेयमारला व्हॉलीच्या माध्यमातून पास दिला. याचा फायदा उठवत नेयमारने गोल केला. यानंतर बार्सिलोनाने चेंडूवर नियंत्रण राखले, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. निर्धारित वेळेत दोन गोलसह बार्सिलोनाने सरशी साधली.

रिअल माद्रिदने इस्को, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जेस या तिघांच्या गोलच्या जोरावर विजय मिळवला. पाल्मसतर्फे हरनाइनने एकमेव गोल केला. सेल्टा डी व्हिगोने रिअल सोसिदादवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. सोसिदादतर्फे अगिरेक्सटेने ११व्या मिनिटालाच गोल केला. सहा मिनिटांत सेल्टातर्फे इगो अॅसपासने गोल करत बरोबरी केली. ३७व्या मिनिटाला अगिरेक्सटेने गोल करत सोसिदादला आघाडी मिळवून दिली. सेल्टातर्फे इगो अॅसपासने दुसरा गोल करत बरोबरी केली. सामना संपायला एक मिनिट बाकी असताना पाब्लो हर्नाडिझने निर्णायक गोल करत सेल्टाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader