अॅटलेटिक बिलबाओ संघाने शेवटच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे त्यांनी बार्सिलोनाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. सामना बरोबरीत सुटल्यामुळे बलाढय़ बार्सिलोनाला स्पॅनिश लीग जेतेपदावर नाव कोरण्यासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुसऱ्या क्रमांकावरील रिअल माद्रिदचा पराभव आणि बार्सिलोनाचा विजय यामुळे लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना संघाचे जेतेपद पाच सामने शिल्लक राखून निश्चित होणार होते. पण बार्सिलोनाला बरोबरी स्वीकारावी लागली तर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रिअल माद्रिदने अॅटलेटिको माद्रिद संघावर २-१ अशी मात केली. आता बार्सिलोना ११ गुणांच्या फरकाने आघाडीवर आहे.
अॅटलेटिक बिलबाओ संघाने २७व्या मिनिटालाच मार्केल सुसाआटा याच्या गोलमुळे आघाडी घेतली. बार्सिलोनाने बरोबरी साधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. दुसऱ्या सत्रात सुसाआटाने फ्री-किकवर मारलेला फटका गोलबारला लागून बाहेर गेला, अन्यथा बार्सिलोना संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला असता. दुखापतीने त्रस्त असलेला लिओनेल मेस्सी तासाभराच्या खेळानंतर मैदानात उतरला आणि त्याने ६७व्या मिनिटाला बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. मेस्सीचा हा या मोसमातील स्पॅनिश लीगमधील ४४वा गोल ठरला. दोन मिनिटांनंतर अॅलेक्सी सांचेझने अप्रतिम गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर आणले. विजयासह तीन गुण बार्सिलोनाच्या पारडय़ात पडणार, असे वाटत असतानाच ९०व्या मिनिटाला अँडर हेरेरा याने गोल करत बार्सिलोनाचे जेतेपद लांबणीवर टाकले. आता पुढील रविवारी रिअल बेटिसविरुद्ध जेतेपद पटकावण्याची संधी बार्सिलोनाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2013 रोजी प्रकाशित
बार्सिलोनाचे जेतेपद लांबणीवर
अॅटलेटिक बिलबाओ संघाने शेवटच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे त्यांनी बार्सिलोनाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. सामना बरोबरीत सुटल्यामुळे बलाढय़ बार्सिलोनाला स्पॅनिश लीग जेतेपदावर नाव कोरण्यासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
First published on: 29-04-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona should wait for championship