एकापेक्षा एक सरस खेळाडू आणि आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या बार्सिलोनाचे ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे. शनिवारी झालेल्या लढतीत वल्लाडोलिडने बार्सिलोनावर १-० असा विजय मिळवत खळबळजनक विजयाची नोंद केली. सुमार प्रदर्शनामुळे वल्लाडोलिडवर तळाच्या गटात रवानगी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी बलाढय़ बार्सिलोनाला नमवत सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. दुसरीकडे साखळी गटाच्या सात साखळी लढतींपैकी तिसऱ्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने बार्सिलोनाचे जेतेपदाचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. वल्लाडोलिडतर्फे फौस्तो रोसीने एकमेव गोल केला. लिओनेल मेस्सीने तब्बल चारवेळा गोल करण्यासाठी प्रयत्न केले मात्र वल्लाडोलिडचा गोलरक्षक दिएगो मारिनोने जबरदस्त बचावाचे प्रदर्शन करताना हे प्रयत्न हाणून पाडले. नेयमारनेही मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. जॉर्डी अल्बा आणि आंद्रे इनेस्टा या भरवशाच्या खेळाडूंची अनुपस्थिती बार्सिलोनाला प्रकर्षांने जाणवली.

Story img Loader